

नांदेड : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या सक्षम ताटे (वय २५) याच्या हत्ये प्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. अमन शिरमे असे या आरोपीचे नाव असून या प्रकरणात आता आरोपींची संख्या सात झाली आहे. दरम्यान वंचित आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी गुरुवार (दि.4) आज रोजी संबंधित तरुणीची भेट घेऊन तिच्या पुढील शिक्षणाच्या खर्चाची घोषणा केली आहे.
शहरातल्या मिलिंदनगर परिसरातील सक्षम ताटे (वय २५) या तरुणाची २७ नोव्हेंबर रोजी निघृण हत्या करण्यात आली होती. प्रेम प्रकरणातून घडलेल्या या घटनेला जातीयतेचे रूप देण्यात आले होते. निघृण हत्या झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मुख्य सहा आरोपींना तात्काळ अटक केली होती. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर एका महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. उर्वरित गजानन मामीडवार, साहिल मामीडवार, सोमेश लख्खे, वेदांत कुदळेकर हे चौघे पोलीस कोठडीत आहेत.
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपधीक्षक प्रशांत शिंदे व त्यांच्या पथकाने या प्रकरणात फरार झालेल्या अमन देविदास शिरमे याला मंगळवारी रात्री चिखलवाडी परिसरातून ताब्यात घेतले. अमन याचा प्रत्यक्ष हत्या करण्यात सहभाग होता असे सांगण्यात आले. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. आज त्याला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक असलेल्या चौघांची पोलीस कोठडी वाढवून मिळण्यासाठी पोलीस प्रयत्नरत असल्याचे सांगण्यात आले.
अंजली आंबेडकरांनी घेतली युवतीची भेट
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी अत्याचारग्रस्त मुलीची भेट घेऊन तिच्या धाडसाचे कौतुक केले. अत्याचार झालेल्या आंचलला तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च वंचित आघाडीच्या वतीने करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली.