

नांदेड : सक्षम ताटे प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मृत सक्षमच्या आई आणि प्रेयसीने बुधवारी (दि.२४) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान राखत त्यांना अडवल्याने अनर्थ टळला. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली होती.
बुधवारी (दि.24) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मृत सक्षमची आई संगीता ताटे आणि त्याची प्रेयसी आंचल मामिडवार या दोघींनी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. प्रशासन आणि पोलिस सहकार्य करत नसल्याच्या भावनेतून त्यांनी सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल अचानक अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ धाव घेत त्यांच्या हातातील पेट्रोलच्या बाटल्या हिसकावून घेतल्या आणि त्यांना शांत केले.
काय आहे प्रकरण?
प्रेम प्रकरणातून प्रेयसीचे वडील, भाऊ आणि मित्रांनी मिळून सक्षम ताटे याची भररस्त्यात गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून निघृण हत्या केली होती. या घटनेने नांदेड हादरले होते. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र पोलिस तपासामध्ये आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप सक्षमच्या आईने आणि प्रेयसीने केला आहे. जोपर्यंत आरोपींना कडक शिक्षा होत नाही, तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.