नांदेड : गोदावरी व पैनगंगेच्या वरील भागात यावर्षी मुबलक पाऊस झाल्यामुळे धरणं तर भरलीच, परंतु निसगनिही कात टाकली आहे. पावसाळा लांबल्यामुळे आणखी पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आठवड्यानंतर नवरात्रौत्सव सुरु होत असून माहूर येथे दर्शनासाठी जाताना पावसाळी सहलीचे नियोजन करण्याकडे भाविकांचा कल वाढतो आहे. यंदा पावसाळा सुरु झाल्यापासून आजवर सुमारे पाच ते सात लाख पर्यटकांनी भेट दिल्याचे सांगण्यात आले.
ऑगस्ट महिन्यात संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पैनगंगा दुथडी भरुन वाहू लागली. या नदीवर किनवट तालुक्यातील सहस्रकुंड येथील सहस्रधारांचा धबधबाही फेसाळत कोसळू लागला. त्यावेळी तर मराठवाडा, विदर्भासह अदिलाबाद जिल्ह्यातील पर्यटकांनी गर्दी केलीच. परंतु पर्यटनप्रेमी मंडळी दूरवरुन मुद्दाम आली होती. आता धबधबा काहीसा रोडावला असला तरी निसर्गसौंदर्य काही कमी झालेले नाही. उलट पावसाळा लांबल्यामुळे सहलीचा आनंद द्विगुणित होईल.
दि. ३ ऑक्टोबरला घटस्थापना आहे. दुसरे दिवशीपासून हजारो भाविक माहूर येथे आदीशक्तीच्या साडे तीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथे रेणुकामातेच्या दर्शनासाठी जातात. माहूर गडावरील निसर्गही नयनमनोहर झाला असून डोंगरावरुन ओहोळ, झरे वाहतानाची छायाचित्रं सोशल मिडियावरुन व्हायरल होत आहेत. शिवाय माहूर येथे आलेले भाविक पुढे उनकेश्वर येथे गरम पाण्याच्या झन्यासाठीही जात असतात. माहूर व उनकेश्वर येथे निवासाचीही सोय आहे.
या तुलनेत सहस्रकुंड येथे अद्याप तशी सोय झालेली नाही. एक यात्री निवास बांधून पूर्ण झाले आहे. परंतु देयक थकित असल्यामुळे ते कंत्राटदाराच्याच ताब्यात आहे. त्यामुळे पर्यटनहीं विकसीत होत नाही. शासनाने सहखकुंडला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले असले तरी सर्वांगिण विकासासाठी पुरेसा निधी दिलेला नाही. येथील विकासासाठी बाणगंगा महादेव मंदीर विश्वस्त मंडळ प्रयत्नशील असल्याचे सतीश वाळकीकर यांनी सांगितले.
निसर्गप्रेमींनी थोडेसे नियोजन केल्यास निसर्गासह धार्मिक पर्यटनाची सांगड घालता येऊ शकते. एका दिवसाच्या माहूर किंवा उनकेश्वर येथील मुक्कामाची तयारी ठेवल्यास सहस्रकुंडचे मनोहारी दृश्य नजरेत साठवतानाच मोबाईलबद्धही करता येईल. सहस्रकुंड येथे सुरक्षित उभे राहून धबधब्याचे नयनरम्य रुप पाहण्याची सोय केली आहे. या परिसरात एक सुंदर बागही विकसीत करण्यात आली आहे. किमान नांदेड जिल्ह्यातील पर्यटनप्रेमींसाठी ही चांगली पर्वणी ठरु शकते. किंबहुना ऑक्टोबर अखेर दिवाळी सुरु होत असून या निमित्त दहा ते १५ दिवसांच्या सुट्यांमध्येही निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटता येऊ शकतो