Nanded News : सावरखेडच्या शोकाकुल कुटुंबासोबत आ. राजेश पवार यांची दिवाळी!

सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम चर्चेत
Diwali Celebration
आ. राजेश पवारpudhari photo
Published on: 
Updated on: 

नांदेड :दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई, फटाके आणि आनंदोत्सव नव्हे, तर समाजातील दुःखी, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा दिवा प्रज्वलित करण्याचा सण आहे. याच सामाजिक जाणिवेतून नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी नायगाव तालुक्यातील सावरखेड येथील एका शोकाकुल गायकवाड कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांना धीर दिला. या कुटुंबाच्या दिवाळी सणात ते सहभागी झाले.

या कुटुंबातील ऋषिकेश या २२ वर्षीय मुलाचा महिनाभरापूर्वी मोटारसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. ऐन दिवाळीच्या काळात या कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले होते. अशा परिस्थितीत आ.राजेश पवार यांनी या कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले, त्यांच्यासोबत बसून भोजन केले आणि आर्थिक मदत, दिवाळी फराळ तसेच दिवाळी भेट देऊन त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला.

Diwali Celebration
Jalna Fire : शेतकऱ्याच्या संसाराची राखरांगोळी; शेडला आग

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात होरपळलेल्या गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करण्याचे आवाहन लोकप्रतिनिधींना केले होते. दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई आणि विविध आर्थिक संकटांमुळे अनेक कुटुंबे अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला सरकार आपल्या पाठीशी आहे, पक्ष आपल्या पाठीशी आहे, आपले लोकप्रतिनिधी सुख-दुःखात आपल्यासोबत आहेत, असा विश्वास देणे हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनामागील मुख्य उद्देश होता.

या आवाहनाला प्रतिसाद देत आ.राजेश पवार यांनी सावरखेड येथील दुःखग्रस्त कुटुंबाची निवड केली. या कुटुंबाने आपला एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य आहे. मात्र, अशा कठीण प्रसंगी लोकप्रतिनिधीने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत वेळ घालवणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि शक्य ती मदत करणे, यातून त्या कुटुंबाला मानसिक आधार मिळावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

Diwali Celebration
Rohit Pathare Case : वैजापुरातील गँगवॉरचा तपास वेगात; सतरा जण पोलिसांच्या ताब्यात

आ.पवार यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. दिवाळी फराळ व भेटवस्तू देण्याबरोबरच त्यांनी स्वतःच्या वतीने आर्थिक मदतही केली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांसोबत बसून भोजन केले. “एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करणे म्हणजे उत्सव साजरा करणे नव्हे, तर त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देणे होय. त्यांच्या मुलाची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही.

या कुटुंबाला आपण एकटे नाही, हा विश्वास देण्याचा माझा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाचा हाच खरा अर्थ आहे. दुष्काळ असो, आर्थिक संकट असो किंवा वैयक्तिक दुःख असो, माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या सुख-दुःखात मी कायम त्यांच्या पाठीशी उभा राहीन,” अशी भावना आ.राजेश पवार यांनी व्यक्त केली.

पत्नीवर उपचार सुरू असतानाही…!

आमदार राजेश पवार आणि त्यांच्या पत्नी पूनम पवार हे दाम्पत्य दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने गोरगरीब, गरजू आणि वंचित कुटुंबांसोबत आनंद वाटून घेण्याचा उपक्रम राबवत असतात. ही परंपरा त्यांनी केवळ यंदाच नव्हे, तर अनेक वर्षांपासून जपली आहे. मात्र, यंदा त्यांच्या स्वतःच्या कुटुंबावरही मोठे आरोग्यसंकट आले आहे. पूनम पवार यांच्यावर मुंबई येथे कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे आमदार पवार यांना पत्नीच्या उपचारांसाठी मुंबईत वेळ द्यावा लागत आहे. स्वतःच्या कुटुंबावर संकट ओढावलेले असतानाही मतदारसंघातील दुःखग्रस्त कुटुंबाची आठवण ठेवून त्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करण्याच्या त्यांच्या कृतीतून सामाजिक संवेदनशीलतेचा प्रत्यय आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.