

वैजापूर : विसर्जन मिरवणुकीतील वादातून पेटलेल्या संघर्षाने एका तरुणाचा जीव घेतला आणि संपूर्ण वैजापूर हादरले. रोहित अनिल पठारे खून प्रकरणात आता पोलिसांनी फरार आरोपींच्या भोवतीचा फास आणखी आवळला आहे. सोमवारी पहाटे पर्यंत सुरू झालेल्या अटकसत्रात सहा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या, तर एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी अटक केलेल्या १० आरोपींसह आता या प्रकरणाशी संबंधित एकूण १७ जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. मात्र, अद्याप काही आरोपी फरार असल्याने पोलिसांची शोधमोहीम सुरूच आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपींमध्ये अविनाश ऊर्फ अनिकेत पोपट होंड, ज्ञानेश्वर सीताराम वडाळकर, प्रतीक कैलास साळुंके, रोहित मच्छिंद्र आहेर, संकेत आदिनाथ आहेर आणि तुषार आदिनाथ आहेर (सर्व रा. वैजापूर) यांचा समावेश आहे.
पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे काही आरोपींना पहाटेच पकडण्यात आले. तर काहींचा आंतरजिल्ह्यात शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यात आले. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या या कारवाईमुळे फरार आरोपींच्या हालचालींवर पोलिसांनी पकड मिळवली.
फरार आरोपींचा माग काढण्यासाठी पथके
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार अपर पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि विविध ठिकाणच्या शोधमोहिमेच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली.
या कारवाईनंतरही तपास थांबलेला नसून उर्वरित फरार आरोपींचा माग काढण्यासाठी पथके सक्रिय आहेत. आता १७ जण पोलिसांच्या ताब्यात असले तरी फरार आरोपींची धरपकड आणि या संघर्षामागील संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.