

Rainfall exceeds average in Nanded district; Demand for special package
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : पावसाचे अद्याप दोन महत्वाचे उत्तरा व हस्त नक्षत्र शिल्लक असताना सर्वच तालुक्यांनी आजवर अपेक्षित सरासरीच्या टक्केवारीची शंभरी ओलांडली आहे. तब्बल सहा तालुक्यांत १४० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. तर लोहा तालुक्यात सर्वाधिक तब्बल १५१.५३ टक्के पाऊस झाला. ओला दुष्काळ सदृश परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असून विशेष पॅकेजची मागणी लोकप्रतिनिधींच्या मार्फत केली जात आहे.
नांदेड जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान २०२० सालापासून ८९१.३० करण्यात आले आहे. पूर्वी ते ९५५ होते. किनवट व माहूरचे वार्षिक १२५० मिमी वरुन १०.२६ करण्यात आले आहे. गतवर्षी सुद्धा आजवर अपेक्षित पावसाच्या सरासरीच्या तुलनेत ११४.०३ टक्के पाऊस झाला होता. यंदा त्यापेक्षाही अधिक पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे यंदा अतिवृष्टीने कहर केला असून ९३ महसूल मंडळांपैकी अपवाद वगळता बहुतांश मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. सध्या पूर्वा नक्षत्र सुरु असून यापूर्वी आश्लेषा व मघा या नक्षत्रांनी जिल्हा जलमय करुन टाकला. त्यानंतर सध्याच्या पूर्वा नक्षत्रानेही सातत्य कायम ठेवले आहे.
पूर्वा नक्षत्र सुरु होऊन जेमतेम चार दिवस झाले, परंतु पाऊस किरकोळ का होईना सुरुच आहे. बुधवारी (दि. ३) सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ८.२० मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मुखेड, कंधार, लोहा या तालुक्यात २० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला. उर्वरित तालुक्यात नाममात्र पावसाची नोंद आहे. यावर्षी दि. १ जून पासून दि. ३ सप्टेंबरपर्यंत जेवढा पाऊस अपेक्षित आहे. त्या तुलनेत सर्वाधिक १५१.५३ टक्के म्हणजे ८३६ मिमी पाऊस लोहा तालुक्यात झाला. तर सर्वात कमी बिलोली तालुक्यात १००.५१ टक्के अर्थात ६७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याच्या हिशोबानुसार दि. १ जून ते ३१ ऑक्टोबर हा पावसाळ्याचा कालावधी मोजला जातो. परंतु पारंपरिक पद्धतीनुसार नक्षत्रानुसार पाऊसमानाचा अंदाज लावला जातो. यानुसार सध्या पूर्वा नक्षत्र सुरु असून दि. १३ सप्टेंबरला उत्तरा नक्षत्र सुरु होत आहे. त्यानंतर १५ दिवसांनी दि. २७ सप्टेंबरला हस्त नक्षत्र लागेल. परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार व लौकिक वास्तवानुसार ऑक्टोबरपर्यंत पावसाळा लांबतो. या कालावधीत सद्यस्थितीप्रमाणे पावसाचे सातत्य राहिल्यास किती टक्के पाऊस पडेल, याचा अंदाज वर्तविणे कठिण आहे.