

Railway gates closed 35 times a day
नरेंद्र येरावार
उमरी, पुढारी वृत्तसेवा उमरी शहरातून नांदेडला आणि भोकरला जाण्यासाठी रेल्वेचे फाटक ओलांडावे लागतेच. अशा परिस्थितीत येणाऱ्या आणि जाणाऱ्या पॅसेंजर एक्स्प्रेस रेल्वे गाड्यासह मालवाहतूक करणाऱ्या मालगाड्यांची संख्या भरपूर आहे. दिवसातून जवळपास ३५ वेळा रेल् वेचे फाटक बंद होते. त्यामुळे वाहन चालकांना थांबावे लागते. बहुतांश वेळा अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना नांदेडला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेलादेखील बंद रेल्वे फाटकाचा फटका बसतो. या मार्गावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.
उमरी शहराच्या मध्यवर्ती भागात सध्याचे रेल्वेस्थानक आहे. पहिल्या भागात मोंढा, उमरीची बाजारपेठ आणि दुसऱ्या भागात सर्वच शासकीय कार्यालये असलेला व्यंकटेशनगरचा भाग अशी दोन भागात शहराची विभागणी झालेली आहे. दोन्ही भागांच्या मधोमध उमरीचे रेल्वे स्थानक आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून उमरी शहराला लोहमार्ग जोडलेला आहे. या लोहमार्गाचे रुंदीकरण झाले, उमरीतील रेल्वेस्थानकाची सुधारणा झाली. या भागाचे विद्युतीकरण झाले. त्यामुळे तेलंगणा, आंध्रप्रदेश, सिकंदराबाद, तिरुपतीकडे आणि नांदेड, मनमाड, मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या पॅसेंजर आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्यांची संख्या जास्त आहे.
तसेच मालवाहतूक करणाऱ्या मालगाड्यांची संख्याही भरपूर आहे. त्यामुळे रेल्वे फाटक बंद होते. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल दिवसातून ३५ वेळा रेल्वे फाटक बंद होते. काही वेळा दोन्ही रेल्वे गाड्या क्रॉसिंगसाठी येत असल्याने अर्धा अर्धा तास रेल्वे फाटक बंद होते. परिणामी बंद रेल्वे फाटकाचा सर्वच वाहन चालकांना फटका बसतो. याकडे मात्र गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.
व्यंकटेशनगर, नागझरीनगर, गणेश नगर, आनंदीबाईनगर या भागात मोठी वसाहत आहे शिवाय पोलीस स्टेशन, पंचायत समिती, तहसील, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण विभाग, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, तलाठी सज्जे, ग्रामसेवकांचे कार्यालय, पोलिस वसाहत, शाळा, महाविद्यालये, दुय्यम निबंधक, न्यायालयासह सर्वच शासकीय कार्यालयांचा कारभार चालतो आणि दुसऱ्या भागात शहराची मोठी बाज ारपेठ, बसस्थानक, रेल्वेस्थानक, ग्रामीण रुग्णालय आहे.
त्यामुळे या भागातील लोकांना व्यंकटेशनगरकडे शासकीय कार्यालयीन कामे करण्यासाठी जावे लागते. आणि त्या भागातील नागरिकांना या भागात यावे लागते. येणाऱ्या जाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्यांनाही बंद रेल्वे फाटकाचा फटका सहन करावा लागतो. एका रेल्वे गाडीला पंधरा मिनिटे आणि दोन रेल्वे गाडीला अर्धा तास रेल्वे फाटक बंद असल्याने नाईलाजास्तव बाहनचालकांना थांबावेच लागते. रुग्णवाहिका असो, शासकीय वाहन असो, पोलिसांचे वाहन असो त्यांना देखील थांबावे लागते.
अशा परिस्थितीत या मार्गावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी होत आहे. येथील सर्वच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शाळा महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, व्यापारी, रेल्वेने ये जा करतात. त्यांनाही जाण्या येण्यासाठी बंद रेल्वे फाटकाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकांचा वेळ वाया जातो.