

नांदेड : नांदेड जवळच्या पुयडवाडी शिवारात झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. अंकुश रामराव पुयड (वय 31, रा. वडगाव, ता. नांदेड) असे या आरोपीचे नाव असून, नांदेड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (दि. 11) रात्री तुप्पा शिवारात सापळा रचून त्याला शिताफीने अटक केली.
शनिवारी (दि. 7) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पुयडवाडी शिवारातील नारायण पुयड यांच्या शेतातील घराजवळ खुनाची घटना घडली होती. याप्रकरणी मयताचा भाऊ भारत बालाजी पुयड (वय 23, रा. पुयडवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील फरार आरोपींविरुद्ध विशेष धरपकड मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे पथक आरोपींच्या शोधात होते. बुधवारी रात्री गस्त घालत असताना, पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी अंकुश पुयड हा तुप्पा शिवारात लपून बसला आहे. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत सापळा रचला आणि त्याला बेड्या ठोकल्या.