

Police raid fashion 'spa' center
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : वजिराबाद भागातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या जुन्या भाजी मार्केटच्या इमारतीत सुरु असलेल्या 'स्पा' सेंटरवर अवैध धंदे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी (दि.१३) रात्री त्यांनी धाड टाकून एक महिला व तीन पीडित तरुणी तसेच मॅनेजरसह पाच जणांना ताब्यात घेतले.
धाड टाकल्यानंतर काही जण विचित्र अवस्थेत आढळून आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळावरून बऱ्याच आक्षेपार्ह वस्तू पोलिसांनी जप्त केल्या असून, रात्री उशिरा वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी कॅनाल रोडवरच्या 'स्पा' सेंटरवर भाग्यनगर पोलिसांनी धाड टाकल्यानंतर शहरातील अन्य 'स्पा' सेंटर चर्चेत आले होते. वजिराबाद भागातील फॅशन 'स्पा' सेंटर मसाजच्या नावाखाली खुलेआम कुंटणखाना चालत असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत गेल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील अधिकाऱ्यांनी वजिराबाद पोलिसांना सोबत घेऊन संयुक्त कारवाई केल्याचे सांगण्यात आले.