

Person arrested for demanding extortion from an engineer.
नांदेड, पुढारी वृत्तसेवा धर्माबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्याला पाच हजार रुपयांची खंडणी मागणा-याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुस-या दिवशी म्हणजे रविवारी (दि.७) मुसक्या आवळल्या. पांडुरंग तोलबा वन्ने (वय ६०, रा. वाका, ता. लोहा) असे त्याचे नाव आहे.
धर्माबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता हनुमंत रावसाहेब नरवाडे यांना आरोपी पांडुरंग तोलबा वन्ने (वय ६०, रा. वाका, ता. लोहा) याने शनिवारी दि. ६ जून रोजी फोन करून पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. पाच हजार रुपये न दिल्यास गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर धर्माबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या गुन्हाचा तातडीने छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि रवि वाहूळे यांनी सायबर सेलची मदत घेत आरोपी पांडुरंग तोलबा वन्ने याचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपीला त्याच्या सुनीलनगर (बळीरामपूर) येथील घरातून ताब्यात घेतले.
त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार आरोपी देविदास गणेश गायकवाड (रा. जवाहरनगर, तुप्पा) व अशोक वाघमारे (रा. एकलारा, ता. मुखेड) यांच्या मदतीने शाखा अभियंता हनुमंत नरवाडे यांना फोनवरून खंडणी मागितल्याचे कबूल केले. त्यानंतर गुन्ह्यात वापर-लेला मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी स्थागुशाने त्याला धर्माबाद पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे.
या गुन्ह्याची उकल केल्याबदद्ल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सूरज गुरव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोउनि माधव केंद्रे, बळीराम दासरे, पोलीस कॉस्टेबल देविदास चव्हाण, मोतीराम पवार, महेश बडगू, पोहेकाँ सिद्धार्थ सोनसळे, सायबर सेलचे पोहेकाँ राजु सिटीकर व दीपक ओढणे यांचे कौतूक केले आहे.