

One hundred women sarpanches from Punjab visit Yergi
देगलूर, पुढारी वृत्तसेवा : पंजाब राज्यातील १०० महिला सरपंचांनी तहसीलमधील चालुक्य काळातील येरगी गावास भेट दिली आणि तेथील ऐतिहासिक वारसा आणि प्राचीन स्थापत्य कलेची माहिती घेतली. येरगी येथे आल्यावर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताने पंजाबमधील सर्व महिला सरपंच व अधिकारी भारावून गेले. येरगी स्थापत्य कलेचा व विकासाचा अभ्यास करण्यासाठी पंजाब सरकारने त्यांना यशदा पुणे मार्फत पाठवले होते.
पंजाबच्या सर्व महिला सरपंच व पदाधिकारी हे गावात आल्यावर सर्वप्रथम त्यांच्या प्रमुखांच्या हस्ते संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करण्यात आले. संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांची ७५० वी जयंती असल्याने पंजाबमधील महिलांना महाराष्ट्राच्या संत परंपरेची माहिती मिळावी म्हणून हा यामागचा उद्देश होता. या पालखी मिरवणुकीत १५० विद्यार्थिनीच्या लेझीम पथका व भजनी मंडळ पालखीसोबत नाचत गावात मिरवणूक काढली.
तसेच शुक्रवारी, पाहुणे दाखल झाल्यानंतर येरगी बालिका पंचायत आणि गावातील शेकडो महिलांनी गावाच्या प्रवेशद्वारावर सर्व पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन फुर्लाच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी केली. तदनंतर पाहुण्यांना लेझीम पथकासोबत गावात प्रवेश करताना पंजाबच्या महिलांनी नृत्याचा आनंद घेतला आणि पंजाबमधील भांगडा लोकनृत्य सादर केले आणि ग्रामस्थांची मने जिंकली.
तसेच, येरगीच्या रहिवाशांनी देखील त्यांच्यासोबत भांगडा नृत्य सादर केले. पाहुण्यांच्या हस्ते 'एक पेड माँ के नाम' अभियानातंर्गत गावात वृक्षारोपण करण्यात आले. मिरवणुकीचौ सांगता झाल्यावर ग्राम सचिवालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिथे ग्रामपंचायतीने सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगीता पाटील मठवाले होत्या. याप्रसंगी गटविकास अधिकारी श्रीकांत बलदे, यशदा पुणे येथील सूर्यकांत गवळे, सरपंच संतोष पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी दत्तात्रय कुरुंदे, ग्रामपंचायत अधिकारी राजेश तोटावाड, डॉ. किरण ठाकूर इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे यांनी प्रास्ताविक केले आणि सरपंच प्रतिनिधी संतोष पाटील यांनी गावाची ऐतिहासिक माहिती दिली. यावेळी ११ व्या शतकातील चालुक्य राजवंशाच्या शासकाचे येरगी निवासस्थान असल्याची माहिती तसेच गावात असलेले प्राचीन स्थापत्य कलेचे अद्भुत ऐतिहासिक वारसा, शिलालेख, केशवेश्वर मंदिर, सरस्वती मंदिर इत्यादींची माहिती देण्यात आली. यावेळी बालिका पंचायत ची सचिव महादेवी दाणेवार यांनी बालिका पंचायत द्वारे गावात राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. गावातील मुलींच्या सुरक्षेसाठी सरपंच संतोष पाटील यांच्याकडून राबविण्यात आलेल्या कराटे प्रशिक्षण, योग-प्राणायाम, बालविवाह बंदी, गावातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून करत असलेले प्रयत्न आदींची माहिती दिली.
गावात दिसणाऱ्या स्वच्छतेचे कौतुक करत गावात दर रविवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेची माहिती घेतली. त्यांना गावात असलेल्या चालुक्य काळातील १८ विहिरी आणि २ बारव पाहून व चालुक्य कालीन पाणीपुरवठा योजनेच्या अद्भुत स्थापत्यकलेमुळे प्रभावित झाले. तसेच, या प्राचीन विहिरींमधील पाणी पिऊन त्यांनी ते अतिशय गोड असल्याचे सांगितले. कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी मरखेल पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.