Nanded News : फुलांच्या रंगांत उमललेलं नांदेडचं 'बागप्रेम'

रोपातून रोपांकडे... आणि मनातून मनाकडे वाहणारी निसर्गप्रेमाची हिरवी वाट
Nanded News
Nanded News : फुलांच्या रंगांत उमललेलं नांदेडचं 'बागप्रेम'file photo
Published on
Updated on

Nanded's 'love for gardens' blossoming in the colors of flowers

महेश राजे

नांदेड : धावपळीच्या शहरजीवनात कुठेतरी एक हिस्वी, सुगंधी वाट अलगद उमलत आहे. सिमेंटच्या जंगलात हस्वत चाललेल्या निसर्गाला पुन्हा घराच्या अंगणात, गच्चीवर आणि कुंड्यांमध्ये जागा देणाऱ्या बागप्रेमींची ही चळवळ आता केवळ छंद राहिलेली नाही; ती निसर्गाशी पुन्हा नातं जोडण्याची एक सुंदर हाक बनली आहे.

Nanded News
Nanded Political News : ऋणानुबंधाच्या गाठी... केवळ भोकर अन् देगलूरसाठी !

'नांदेड बाग प्रेमी' या समूहाच्या माध्यमातून रोपांपासून फुलांपर्यंत आणि कुंड्यांपासून परसबागांपर्यंत निसर्गाच असंख्य रंग एकत्र येत आहेत. कुणाच्या अंगणात उमललेले गुलाब, कुणाच्या गच्चीवर डोलणारी जास्वंदाची फुले, कुणाच्या कुंडीत फुललेली झेंडूची सोनेरी लडी, तर कुणाच्या बागेत डौलाने फुललेली दुर्मीळ फुले- या सगळ्यांनी शहराच्या जगण्यात एक नवा ऋतू आणला आहे.

या बागप्रेमाची सुरुवात मात्र केवळ फुले लावण्यापासून होत नाही. 'रोप से रोप लगाते चलो... फुलों की खुशबू फैलाते चलो...' हा संदेश घेऊन बागप्रेमी एकमेकांना रोपे, कलमे, बियाणे आणि बागकामाचे अनुभव देत आहेत. एका घरात उमललेले फूल दुसऱ्या घराच्या अंगणात पोहोचते आणि तिथे पुन्हा नव्या रूपाने फुलते. अशा रीतीने एका रोपाचा प्रवास केवळ मातीत होत नाही, तो माणसामाणसांच्या नात्यांतूनही घडतो.

Nanded News
Vimaleshwar Mahadev Temple : श्री विमलेश्वर महादेव मंदिर मरळक येथे मराठवाड्यातील पहिले ३६ फूट उंच त्रिशूल

या समूहाची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्यामागचा 'देण्याचा आनंद'. रोप देताना त्याची किंमत मोजली जात नाही; त्यातून उद्या फुलणाऱ्या फुलाची कल्पना केली जाते. कुणाला एखादे आवडते रोप हवे असेल, तर ते मिळवून देण्यासाठी बागप्रेमी तत्पर असतात. एखाद्या रोपाची निगा कशी राखावी, कोणती माती वापरावी, खत किती द्यावे, कलम कसे करावे, ऋतूनुसार झाडांची काळजी कशी घ्यावी- या सगळ्याचे ज्ञानही येथे मुक्तहस्ताने वाटले जाते.

चलो... फुलों की खुशबू फैलाते चलो...' हा संदेश घेऊन बागप्रेमी एकमेकांना रोपे, कलमे, बियाणे आणि बागकामाचे अनुभव देत आहेत. एका घरात उमललेले फूल दुसऱ्या घराच्या अंगणात पोहोचते आणि तिथे पुन्हा नव्या रूपाने फुलते. अशा रीतीने एका रोपाचा प्रवास केवळ मातीत होत नाही,

तो फुलांचा हा संसार फक्त डोळ्यांना सुखावणारा नाही; तो मनालाही शांत करणारा आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात एखाद्या फुलावर विसावलेला दवबिंदू पाहताना माणूस क्षणभर आपल्या चिंतांपासून दूर जातो. पानांमधून अलगद डोकावणारा सूर्यकिरण, फुलांवर घोंघावणाऱ्या फुलपाखरांची नाजूक लगबग आणि मंद वाऱ्यावर दरवळणारा सुगंध-या सगळ्यांत शहराला हरवलेली संवेदना पुन्हा सापडते.

विविध शहरांपर्यंत विस्तारत आहे. पुणे, नांदेड बागप्रेमी समूहाने फुलांच्या या सौंदर्याला डिजिटल जगाचीही साथ दिली आहे. ऑनलाइन माध्यमातून फुलांची छायाचित्रे, बागांचे अनुभव, रोपांची माहिती आणि बागकामाच्या कल्पना एकमेकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे नांदेडपुरती मर्यादित असलेली ही हिरवी मैफल महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव यांसह विविध भागांतील बागप्रेमी या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.

या समूहाच्या उपक्रमांतून एक महत्त्वाचा विचार सतत पुढे येतो- बाग म्हणजे फक्त झाडांची मांडणी नव्हे; बाग म्हणजे मनाचीही मशागत, मातीशी नातं जोडताना माणूस आपल्या आतली कोरडी जमीनही ओलावतो. रोपाला पाणी घालताना आशा जगवतो आणि फुल उमलताना आपल्या आयुष्यातील छोटासा उत्सव अनुभवतो.

काही जणांकडे मोठ्या बागा आहेत, काहींकडे केवळ दोन-चार कुंड्या; पण निसर्गप्रेमाला जागेची अट नसते. एखाद्या छोट्याशा बाल्कनीत उभे असलेले रोपही घराला हिरवाईचा श्वास देऊ शकते. गच्चीवरची परसबाग शहराच्या आकाशाशी संवाद साधू शकते. कुंडीतील एक फूलही खिडकीतून येणाऱ्या सकाळच्या प्रकाशाला नवा अर्थ देऊ शकते.

या बागप्रेमींच्या प्रयत्नांतून म्हणूनच एक सुंदर संदेश उमटतो- निसर्गाला वाचवण्याची सुरुवात मोठ्या घोषणांनी नव्हे, तर एका छोट्याशा रोपापासून होऊ शकते. एक रोप लावा, त्याची काळजी घ्या, त्यातून दूसरे रोप तयार करा आणि ते कुणाच्या तरी हातात द्या. अशा छोट्या कृतींची साखळीच उद्याच्या हिख्या जगाची पायाभरणी करू शकते.

शहर वाढत जाईल, इमारती उंचावत जातील, रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढत राहील; पण या काँक्रीटच्या गर्दीत जर एखाद्या खिडकीतून गुलाब डोकावत असेल, एखाद्या गच्चीवर मोगरा दरवळत असेल किंवा एखाद्या अंगणात झेंडूची सोनरी रांग उमलत असेल, तर निसर्ग अजूनही आपल्याला सोडून गेलेला नाही, याची खात्री वाटते.

नांदेडच्या या बागप्रेमींची कथा म्हणूनच केवळ फुलांची कथा नाही. ती मातीशी मैत्री करणाऱ्या माणसांची, हिरवाईला कवटाळणाऱ्या मनांची आणि सुगंधाला वाट करून देणाऱ्या संवेदनांची कथा आहे. रोपातून रोप वाढत जावे, फुलातून सुगंध पसरत जावा, आणि एका हिख्या मनातून हजारो हिस्वी मने उमलत जावीत- हीच या बागप्रेमाची खरी फुललेली कहाणी!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news