

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : गणेश उत्सवापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले, परंतु नांदेड जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे मासिक वेतन मिळाले नाही. त्यामुळे या शिक्षकांच्या आनंदावर काही प्रमाणावर विरजण पडले.
गणेश उत्सव, गौरी उत्सव या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेश उत्सवापूर्वीच करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले होते. तशा सूचनाही सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या होत्या. नांदेड जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे मासिक वेतन न झाल्याने शिक्षक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत. मासिक वेतन आठ दिवसांपूर्वी मिळणार असल्याने ते आनंदात होते. परंतु निधी नसल्याचे कारण देत या शिक्षकांना वेतन मिळाले नाही. शिक्षक वेठीस धरण्याचा हा प्रकार म्हणजे शासनाचा निर्णयाचा अनादर असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
विशेष म्हणजे खासगी शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना शिक्षकाचे वेतन दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या खात्यात जमा झाले शिवाय वेगवेगळ्या राज्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही वेतन मिळाल्याने सुखद धक्का बसला पण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आनंदावर मात्र ऐन सणासदीत विरजण पडले. या बाबत शिक्षण विभागाकडून कोणतेही ठोस कारण देण्यात आले नाही. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. राज्य शासन आदेश देऊनही केवळ अनागोंदी कारभारामुळे शिक्षकांचे वेतन झाले नसल्याची भावना शिक्षकामध्ये पसरली आहे.