

उमरी: थोड्या काळाच्या विश्रांतीनंतर बाप्पाच्या आगमनासोबतच वरुण राजाने देखील मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हजेरी लावली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. आज (दि.२८) सकाळपासूनच उमरी शहर व तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. भोकर भागात जोरदार पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे.
कामारेड्डी भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून अंतरराज्य लेंडी धरणात ८९.५० मिमी पाणी साठले आहे. बुडितक्षेत्रातील हसनाळ व रावणगाव पाण्याने वेढले गेले आहेत. मुखेड तालुक्यातील चांडोळा, येवती, मुखेड, जांब, बा-हाळी, मुक्रमाबाद, अंबुलग् आणि जाहुर अशी आठ मंडळांना पावसाचा फटका बसलेला आहे.
दरम्यान उर्ध्वमानार धरणाचे ७ दरवाजे ०.५ मीटर उघडले असून, ३३०.७७१ क्युबिक मीटर/सेकंद विसर्ग सुरू आहे. अजून पाऊस सुरू असल्याने विसर्ग परिस्थितीनुसार वाढवला जाईल, असेही धरणाच्या नियंत्रण विभागाकडून सांगण्यात आले आहे. नरसी परिसरातील चौकातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले असून, प्रसिद्ध बालाजी मंदिर परिसरात पाणीच पाणी झाले आहे.
गडगा परिसरात रात्रीपासून ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू असून, आताही जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ओहोळ व नाले तुडुंब भरून वाहत आहेत.