

किनवट : किनवट तालुक्यातील निचपूर आणि कनकवाडी सज्ज्यात कार्यरत असलेल्या दोन महिला तलाठींना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांच्याकडून रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई 3 जून 2025 रोजी करण्यात आली.
तक्रारदाराच्या वडिलोपार्जित 7 एकर शेतजमिनीतून अर्धा हिस्सा त्यांच्या पत्नीच्या नावावर करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. यासाठी निचपूरच्या तलाठी भाग्यश्री भीमराव तेलंगे यांनी सुरुवातीला 40 हजार रुपयांची मागणी केली होती, परंतु तडजोडीनंतर ही रक्कम 17 हजार रुपयांवर आणण्यात आली होती. सदर तक्रार 29 मे 2025 रोजी प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने पडताळणी करून 3 जून रोजी सापळा रचला.
पंचासमक्ष झालेल्या पडताळणीत कनकवाडी येथील तलाठी सुजाता शंकर गवळे यांनी तक्रारदाराकडील कागदपत्रे घेतल्यानंतर "तेलंगे मॅडम सांगतील तसे करा" असे सांगितले. त्यानंतर लाच रक्कमेचा व्यवहार ठरवला गेला. तलाठी तेलंगे आणि गवळे यांनी मिळून तक्रारदाराकडून 16 हजार रुपये स्वीकारले. या वेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोघींनाही रंगेहाथ पकडले.
आरोपींकडून दोन मोबाईल फोन, रोख रक्कम व कागदपत्रे जप्त करण्यात आली. तलाठी तेलंगे यांच्याकडून 6,620 रुपये आणि गवळी यांच्याकडून 18,820 रुपये रोख रक्कम सापडली. आरोपींच्या नांदेड व किनवट येथील घरांची झडती सुरू आहे. याप्रकरणी भ्रष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, दोघी आरोपी ताब्यात आहेत.
ही कारवाई नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक प्रिती जाधव, पो.उपनिरीक्षक शेख रसूल, अरशद अहेमद खान, सय्यद खदीर व गजानन राऊत यांचा समावेश होता. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार यांचे मार्गदर्शन लाभले.