

Nanded Water Shortage
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जून महिना संपत आला तरी जोरदार पाऊस नसल्यामुळे शहरात काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो आहे. विशेषतः बहुमजली इमारतीमधील रहिवाशांना टंचाईने ग्रासले आहे.
गतवर्षी जुलैच्या मध्यानंतर पावसाला सुरुवात झाली होती. पण, त्यानंतर छोटे-मोठे सर्व जलाशय भरले. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात फारशी टंचाई जाणवली नाही. पावसाळ्याच्या पूर्वीच मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात मान्-सूनपूर्व पावसाने नियमित व जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बंद पडलेले बोअर पुन्हा चालू होतील व टंचाईवर मात करता येईल, असा अंदाज होता. त्या दृष्टीने महानगर पालिकेने दररोज पाणी सोडावे, अशी मागणीही होऊ लागली.
दरम्यान, महानगरपालिकेने घाई न करता पाणीकपात चालू ठेवली. त्याचा आता फायदा होताना दिसतो आहे. अजूनही विष्णुपुरी प्रकल्पात सुमारे २० टक्के जलसाठा आहे. पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतली आहे. वास्तविक मान्सूनचे अधिकृत आगमन झालेच नाही, अशी परिस्थिती आहे. गतवर्षीपेक्षा सुमारे ३० टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात टंचाईच्या झळा ऐन पावसाळ्यात बसू लागल्या आहेत.
जून महिना संपत आला असताना नांदेड शहराच्या काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे, ज्या भागात भूगर्भात मुबलक पाणी नाही, परंतु बहुमजली इमारती झाल्या आहेत, त्या ठिकाणी टंचाईची तीव्रता अधिक असून ५००० लिटरच्या टँकरची खेप १३०० रुपयांना आहे. आणखी पावसाने विश्रांती घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.