

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा सोमवारी झाल्यानंतर नांदेड-वाघाळा मनपाच्या निवडणुकीसाठी आधीपासूनच मोर्चेबांधणी करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने दुसऱ्याच दिवशी पक्षभरती करताना काँग्रेसच्या माजी महापौर, उपमहापौर यांच्यासह इतरांनाही भाजपात दाखल करून घेतले.
राज्याचे महसूलमंत्री तसेच राज्याचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे वसमत येथील जाहीर सभेला जाण्यासाठी मंगळवारी नांदेडमध्ये आले होते. तेथे जाण्यापूर्वी त्यांच्या तसेच माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या माजी महापौर जयश्री पावडे, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांच्यासह काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ॲड.नीलेश पावडे, मनसेचे माजी जिल्हाप्रमुख विनोद पावडे आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपाचे उपरणे गळ्यात घालून घेतले.
येथील एका हॉटेलच्या सभागृहात घाईघाईने पार पडलेल्या या कार्यक्रमास भाजपाचे संघटनमंत्री संजय कौडगे, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री द.पां.सावंत, जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल, पक्षाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी आणि अनेक इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
अशोक चव्हाण यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेडमधील ज्या प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात जाण्याचे टाळले होते, त्यांत पावडे दाम्पत्य आणि सतीश देशमुख यांचा समावेश होता; पण पक्षात योग्य तो सन्मान राखला न गेल्यामुळे त्यांनी नवा पर्याय निवडला. पावडे हे सावंत यांचे तर सतीश देशमुख हे राजूरकर यांचे निकटवर्ती समजले जातात. जयश्री पावडे व सतीश देशमुख या दोघांची उमेदवारी प्रवेशासोबतच निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
मनपा निवडणुकीसाठी भाजपाने 20 प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया मागील आठवड्यात पार पाडली. ती झाल्यानंतर ज्या प्रभागांमध्ये पक्षाला सक्षम उमेदवारांची गरज आहे, अशांचा शोध सुरू झाला असून पहिल्या प्रयत्नांत वरील दोन माजी पदाधिकारी भाजपाच्या गळाला लागले.
नांदेड ः मनपा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवार ठरविण्याचे पाऊल टाकले असताना, काँग्रेस पक्षामध्ये सामसूम दिसत आहे.
नांदेड-वाघाळा मनपाची स्थापना 1997 साली झाल्यानंतर पहिले एक वर्ष वगळता उर्वरित 24 वर्षे या संस्थेत काँग्रेसने पक्षाचे तत्कालीन नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपले वर्चस्व राखले. पण आता चव्हाण अनेक माजी नगरसेवक-कार्यकर्त्यांसह भाजपावासी झाल्यामुळे नांदेड शहरातील काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झाला आहे.
लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण हे काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव भांडवल मानले जाते. 11 नगरपालिकांच्या निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी पुढाकार घेत पक्षातर्फे दोनशेहून अधिक उमेदवार उभे केले. बहुसंख्य पालिकांत काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले. या निवडणुकांत पक्षाला किती यश मिळणार, ते येत्या रविवारी स्पष्ट होणार असले, तरी शहराच्या मुस्लीमबहुल भागातील इच्छुकांची सक्रियता वगळता इतर भागांत मात्र निरुत्साह दिसत आहे.
2017 ते 2022 या कालखंडात मनपामध्ये काँग्रेस पक्षाचे संख्याबळ 74 तर भाजपाचे केवळ 06 होते. त्याआधी सर्व निवडणुकांत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षात पूर्वीचा जोश, धमक राहिलेली नाही. या पक्षाने मित्रपक्षांना एकत्र आणून भाजपाविरोधात मजबूत आघाडीही केलेली नाही. या पार्श्वभूमीवर पक्षाला मंगळवारपासून गळती लागल्यामुळे पक्षाच्या हितचिंतकांत अस्वस्थता पसरली आहे.
मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागविण्याचा उपचार पूर्ण केला. हे सर्व अर्ज आणि त्यासोबत पक्षाकडे प्राप्त झालेले शुल्क प्रदेश काँग्रेस कार्यालयाने अक्षरशः तगादा लाऊन मागवून घेतले. पण त्यानंतर पक्षात धामधूम निर्माण होण्याऐवजी सामसूम पसरली आहे.
गेल्या आठवड्यात पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम दरक यांची समन्वयकपदी नियुक्ती केली. पण पक्षाचे खासदार आणि त्यांचा चमू अद्याप सक्रिय झाल्याचे दिसत नाही. त्यांतच जयश्री पावडे व सतीश देशमुख यांनी मंगळवारी पक्षाला धक्का दिला.
भाजपाचे उमेदवार निश्चित करताना जवळचा किंवा दूरचा असा भेदभाव कोणाच्याही बाबतीत केला जाणार नाही. जिंकून येण्याची क्षमता असलेल्या इच्छुकांनाच उमेदवारी देण्यात येईल; पण ज्यांना संधी मिळणार नाही, त्यांना अन्य जबाबदाऱ्या देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात येईल.
चंद्रशेखर बावनकुळे महसूलमंत्री
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने नांदेडमधील पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना मंगळवारी मुंबईमध्ये बोलावून घेतले होते. पक्षाकडे 210 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मोहन जोशी यांनी मुंबईला गेलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली.
मुन्ना अब्बास, कोषाध्यक्ष, काँग्रेस