

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक काल जाहीर झाली आणि राजकीय पक्षांच्या हालचालींनी वेग घेतला आहे. लातूरमध्ये काँग्रेस व भाजपा हे बलाढ्य राजकीय पक्ष असले तरी गेल्या पंधरवड्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी महापौर व उपमहापौरांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पारडे जड झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
खरी लढत काँग्रेस व भाजपामध्ये होणार असल्याचे संकेत संकेत असले तरी आरक्षण सोडतीत एकूण 70 जागांपैकी तब्बल 50 जागा 2017 च्या आरक्षणानुसार कायम राहिल्याने व 20 जागांवरील आरक्षण बदलल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीत “गेमचेंजर“ ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
लातूर शहर महानगरपालिकेसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने राजकीय पक्षांच्या बैठकीने वेग घेतला आहे. भारतीय जनता पार्टीकडे गेल्या आठवड्यात 900 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिले आहेत, तर तर काँग्रेसने 17 व 18 डिसेंबर रोजी काँग्रेस भवनात मुलाखती ठेवले आहेत.
या दोन्ही पक्षांकडे कार्यकर्त्यांची संख्या भरमसाठ आहे. तर दुसरीकडे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजपासह काँग्रेससमोर आव्हान उभे केले आहे. एक एक करून युवकांची फळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बांधली जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाची ताकद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा अधिक नसल्यामुळे काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किती जागा सोडेल यावर आघाडीचे अस्तित्व राहणार आहे.
तिकडे भाजपाही मित्र पक्षांना म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि शिंदे शिवसेनेला किती जागा देणार यावर महायुती ठरणार आहे. जागावाटप फिस्कटल्यास ताटातून होऊन मत विभागणी होऊ शकते. विशेष म्हणजे, महायुती, महाआघाडी न झाल्यास काँग्रेस व भाजपाला फटका बसेल, असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवित आहेत.
या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी एकूण 12 जागा व त्यातील महिलांसाठी 6 जागा राखीव, अनुसूचित जमातीसाठी 1, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण जागा 18 त्यापैकी 9 जागा महिलांसाठी राखीव, तर सर्वसाधारण एकूण 39 जागांपैकी 20 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या.
लातूर शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2017 सालच्या चार सदस्य पद्धतीने एकूण 18 प्रभागांमध्ये होणार आहे. प्रभाग एक ते 16 मध्ये प्रत्येकी चार सदस्य व प्रभाव 17 आणि 18 मध्ये प्रत्येकी तीन सदस्य असणार आहेत. आरक्षण सोडतीत एकूण 70 जागांपैकी तब्बल 50 जागा 2017 च्या आरक्षणानुसार कायम राहिल्याने व 20 जागांवरील आरक्षण बदलल्याने भाजपाची हिरोगिरी काँग्रेस रोखणार काय? हा खरा प्रश्न आहे.