

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून नांदेड शहरामध्ये परिवर्तन करण्याच्या आमच्या निर्धाराला साथ देण्याचे आवाहन करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी येत्या 16 तारखेला मतमोजणीनंतर राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर मला रायगडला ऐकायला मिळेल असा आशावाद शुक्रवारी येथे व्यक्त केला.
मनपा निवडणुकीसाठी मागील आठ दिवसांत भाजपाचे अनेक प्रमुख नेते नांदेडला प्रचारार्थ येऊन गेल्यानंतर या पक्षाला आणि या पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या ‘राष्ट्रवादी’ची पहिली मोठी जाहीर सभा तटकरे यांच्या उपस्थितीत झाली. याच सभेमध्ये त्यांच्या हस्ते पक्षाच्या विकासनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पक्षनेत्या रुपाली चाकणकर, ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, आ.प्रताप पाटील चिखलीकर, महानगराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, सुभाष साबणे, मोहन हंबर्डे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा.तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली. आम्ही केंद्रामध्ये एनडीए आणि राज्यात भाजपासोबत असलो, तरी आम्ही फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे पुरस्कर्ते आहोत. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका आहे. अल्पसंख्य समाजाच्या बाबतीत आमची विचारधारा स्पष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. नांदेडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आल्यास पक्षाच्या विकासनाम्यामध्ये देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
नगर परिषदांच्या निवडणुकीत जिल्ह्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश दिले. आता मनपा निवडणुकीत पक्षाचा हा बालेकिल्ला भक्कम होईल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. ज्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत युती झाली आहे, त्या प्रभागात दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. 16 तारखेला निकाल लागेल तेव्हा मी माझ्या मतदारसंघात असेल; पण इथे राष्ट्रवादीच्या घड्याळाचा जो गजर होणार आहे तो मला रायगडावर ऐकू येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापौर पदासाठी भाजपची मदत घेणार नाही - चिखलीकर
नांदेड मनपा निवडणुकीसाठी दक्षिणमध्ये शिवसेनेसोबत युती आहे. शिवसेना 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवित आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. राष्ट्रवादीचे या निवडणुकीत एकूण 57 उमेदवार आहेत. नांदेड मनपावर राष्ट्रवादीचा महापौर निश्चित होईल, त्यासाठी कोणत्याही भाजपाची मदत घेण्याची आवश्यकता भासणार नाही. आम्ही महायुतीत असलो तरीही नांदेडमध्ये कुठल्याही परिस्थितीत महापौर पदासाठी तडजोड केली जाणार नाही. आवश्यकता भासल्यास शिवसेनेसोबत चर्चा करू अशी माहिती आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.