Nanded Crime : पंजाबच्या तरुणाचा नांदेडमध्ये खून; बंदूक परत न दिल्याच्या वादातून हत्या

विष्णुपुरी भागात तरुणाचा खून करून मृतदेह खोलीत लपवला
Nanded Crime
Nanded Crimepudhari photo
Published on: 
Updated on: 

नांदेड : शहरातील विष्णुपुरी भागातील एका बंद खोलीत तरुणाचा खून करून मृतदेह लपवल्याची भीषण घटना २ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी अत्यंत सतर्कता आणि कौशल्याने तपास करत आरोपीच्या अवघ्या काही तासांत मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील मृत आणि आरोपी हे दोघेही पंजाब राज्यातील आहेत.

सनी अजेबसिंग मसीह (वय ३६, रा. इसानगर, बटाला, जि. गुरुदासपूर, पंजाब) असे मयत तरुणाचे नाव असून, दारासिंग गुरुनामसिंग (वय ५१, रा. धुण धैवाला, जि. तरनतारन, पंजाब) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोघेही विष्णुपुरी शिवारात भाड्याच्या खोलीत राहत होते. मृत सनीने आरोपी दारासिंगची छऱ्याची बंदूक हिसकावून घेतली होती. ती बंदूक परत न दिल्याच्या वादातून २९ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता दारासिंगने दगडाने डोक्यावर व तोंडावर गंभीर वार करून सनीचा जागीच खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह खोलीत लपवून बाहेरून कुलूप लावून आरोपी पसार झाला होता.

Nanded Crime
Jalna Sand Mining | अंबड : वाळू तस्करांना ६ कोटी २९ लाखांचा दंड

२ ऑक्टोबर रोजी खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कुलूप तोडले आणि सडलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला. सुरज शास्त्री यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दारासिंग याला अवघ्या काही तासांत जेरबंद केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल पाटील पुढील तपास करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाचा छडा लावण्यात नांदेड पोलिसांना यश आले आहे.

Nanded Crime
Latur News : सीईआयआरच्या मदतीने ५१ हरवलेले मोबाईल शोधले

पोलिसांची धडाकेबाज कारवाई

ही महत्त्वपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोउपनि व्यंकट कुसमे, सुनील भिसे, बाबूराव चव्हाण, सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news