Nanded Vasant Sugar Factory Controversy| जिल्हा बँकेची परवानगी न घेता वसंत कारखान्याचा गाळप हंगाम सुरू; खा. संजय देशमुख आक्रमक

अवसायकांना बँकेचे पत्र; कराराच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप, कठोर कारवाईचा इशारा
Nanded Vasant Sugar Factory Controversy
Nanded Vasant Sugar Factory Controversy
Published on: 
Updated on: 

उमरखेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या उमरखेड तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम बँकेला विश्वासात न घेता सुरू करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. बँकेने अवसायकांना स्पष्ट निर्देश देणारे पत्र पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा खासदार संजय देशमुख आक्रमक झाले असून, अवसायकांना खडे बोल सुनावत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

वसंत सहकारी साखर कारखान्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाची परतफेड वेळेत न झाल्याने थकीत कर्जाची रक्कम ५६ कोटी ५५ लाख रुपयांवर पोहोचली. परिणामी कारखाना अवसायनात गेला. शासनाकडून कारखान्यावर अवसायक नियुक्त करण्यात आला. दुसरीकडे जिल्हा बँकेने सरफेसी कायदा २००२ अंतर्गत कारवाई करून कारखाना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

दरम्यान, कारखान्यातील कामगारांना भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम मिळाली नसल्याने कामगार संघटनेने न्यायालयात धाव घेतली. या न्यायालयीन प्रक्रियेमुळे सरफेसीअंतर्गत सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती मिळाली. त्यानंतर साखर आयुक्तांकडून कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याच्या गाळपातून मिळणारे उत्पन्न आणि निश्चित भाडे यामधून बँकेच्या थकीत कर्जाची वसुली करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

यासाठी भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड, पुणे यांच्यासोबत त्रिपक्षीय करार करण्यात आला. या करारानुसार कारखान्याच्या गाळप हंगामातून बँकेला आर्थिक परतावा मिळणे अपेक्षित आहे. करारानुसार ७५ लाख रुपये भाडे अपेक्षित असून, गाळप सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांत भाड्याची रक्कम अदा करणे तसेच मार्चपर्यंत संपूर्ण आर्थिक हिशेब पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र, गाळप सुरू झाल्यानंतर अपेक्षित आर्थिक व्यवहार झाले नसल्याने कर्जाची परतफेड नियमित झाली नसल्याने थकीत रक्कम आणखी वाढली आहे.

बँकेच्या माहितीनुसार, भैरवनाथ शुगर्स कारखान्याकडून सुमारे १ कोटी ४९ लाख रुपयांची रक्कम येणे अपेक्षित असून, याशिवाय बँकेची अन्य देणीही प्रलंबित आहेत. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने बँकेने अवसायकाचे खाते गोठविण्याची कारवाई केली. तसेच साखर आयुक्तांकडे पत्र पाठवून कारखाना ताब्यात देण्यासह विक्रीची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मात्र, या सर्व घडामोडी सुरू असतानाच भैरवनाथ शुगर लिमिटेडकडून भाडेतत्त्वावर चालविण्यात येणारा वसंत कारखाना बँकेशी चर्चा अथवा परवानगी न घेता सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे. बँकेच्या परवानगीशिवाय कारखाना सुरू करण्याबाबतचा प्रकार करारातील अटींचे उल्लंघन असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. त्यामुळे बँक आणि कारखाना व्यवस्थापन यांच्यातील संघर्ष आता उफाळून आला आहे.

करारातील अटी आणि बँकेची भूमिका

थकीत कर्ज : वसंत कारखान्याचे जिल्हा बँकेकडे ५६ कोटी ५५ लाख रुपये थकीत.

भाडे करार : भैरवनाथ शुगर वर्क्ससोबत त्रिपक्षीय करार.

अपेक्षित भाडे : ७५ लाख रुपये.

आर्थिक अट : गाळप सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांत भाडे आणि मार्चपर्यंत आर्थिक हिशेब पूर्ण करण्याची अट.

बँकेची कारवाई : अवसायकाचे खाते गोठविणे आणि कारखाना ताब्यात घेऊन विक्रीची परवानगी मागणे.

नवा वाद

बँकेची परवानगी व संमती न घेता गाळप हंगाम सुरू केल्याचा आरोप. बँक आणि कारखाना व्यवस्थापन यांच्यात अवसायक मध्यस्थीची भूमिका बजावत असताना बँकेला विश्वासात न घेता गाळप सुरू करण्यामागे नेमका कोणाचा दबाव होता, असा सवाल उपस्थित होत आहे. नव्याने निवडून आलेले अध्यक्ष खासदार संजय देशमुख यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत अवसायकांना सुनावले आहे. बँकेच्या हिताला बाधा पोहोचविणाऱ्या प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

Nanded Vasant Sugar Factory Controversy
Nanded Bird Checklist: नांदेड जिल्ह्याच्या पक्षी यादीत सहा नव्या प्रजातींची भर; धर्माबाद परिसरात १७६ हून अधिक पक्षीप्रजातींची नोंद

भैरवनाथ शुगरकडून अवसायकांची दिशाभूल करण्यात आल्याची चर्चा असून, बँकेचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करून शासनातील मंत्र्यांशी बोलून कारखाना सुरू करण्याबाबत आश्वासनांच्या जोरावर कारखाना सुरू करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा बँक आणि कारखाना चालविणाऱ्या कंपनीतील संघर्ष आता उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Nanded Vasant Sugar Factory Controversy
Nanded Sand Mining Raid : गोदावरी पात्रातील अवैध रेती उपशावर नांदेड पोलिसांची धडक कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.