

Bahadurpura bridge
धोंडीबा बोरगावे
फुलवळ : ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे बहाद्दरपुरा मन्याड नदीवरील पुलावरून दोन वेळा पाणी गेले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पुलाचे अंडरवॉटर परीक्षण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सूचना दिल्या होत्या, त्यानुसार कंधार बस डेपोने या पुलावरून एसटी बस गेल्या तीन महिन्यापासून बंद ठेवल्या आहेत. सध्या शेकापूर घोडज मार्गे कंधार ते मुखेड , जांब या गाड्यांची वाहतूक सुरू आहे त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल तर होतच आहेत वरून आर्थिक भुर्दंड ही सोसावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तत्परता दाखवत सदर पुलावरून वाहतूक सुरू करायला हवी होती. पण अद्यापही केवळ कंधार डेपो च्या एसटी बस येथून सुरू झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे याच पुलावरून दुसऱ्या डेपोच्या एसटी बस आणि एसटी पेक्षा कितीतरी अवजड वाहतूक करणारे वाहने जात येत असतात. त्यामुळे फक्त कंधार आगाराच्याच एसटी बसच्या गाड्यांना बंदी का..? असा प्रश्न या भागातील जनतेला पडला असून याविषयी कोणीही कसा काय आवाज उठवत नाही याचे आश्चर्य वाटत आहे.
याच पुलावरून उदगीर डेपोची एसटी बस आणि रेती वाहण्यासारखे हायवा टिपर, 16 टायरी अवजड वाहने, ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने याच पुलावरून वाहतूक करतात. परंतु, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग गांभीर्याने पाहत नाही किंवा या अवजड वाहनांना ये जा करण्यासाठी अडवले जात नाही. याचाच अर्थ सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलाविषयी कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येते. अवजड वाहनांना का बंदी घातली जात नाही, आणि या अवजड वाहनांच्या ये जा करण्यामध्ये काही धोका झाल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
या पुलावरून जांब, जळकोट, उदगीर आणि मुखेड च्या एसटी बसची नियमित होणारी वाहतूक गेल्या काही महिन्यांपासून शेकापूर घोडज मार्गे ये - जा करत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. त्यांना तिकिटांचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. या पूलाचे अंडरवॉटर परीक्षण ताबडतोब करून या मार्गावरून एसटी बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे.