

Umri Sand Mafia Attack
उमरी : अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उमरी तालुक्यातील ईळेगाव येथील गोदावरी घाटावर गुरुवारी (दि. १०) सायंकाळी घडली. डीवायएसपी शाम पानेगावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकावर १५ ते २० जणांनी काठ्या आणि दगडांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. या घटनेत पथकातील सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. घटनेनंतर ईळेगाव परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले असून, तणावपूर्ण शांतता आहे.
ईळेगाव येथील गोदावरी नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीवायएसपी शाम पानेगावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गुरुवारी सायंकाळी गोदावरी घाटावर कारवाई केली. या पथकात पुंडलिक आलेवाड, गंगाधर घुमपटवार, निरंजन अंबुरे, होमगार्ड एडके, शेख, पोवाडे, शेख अजमल, गजानन कोत्तापल्ले यांच्यासह पोलिसांचा समावेश होता.
पोलिसांचे पथक घाटावर पोहोचताच तेथे उपस्थित असलेल्या १५ ते २० जणांनी पोलिसांवर हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हल्लेखोरांनी काठ्या, लाठ्या तसेच दगडांचा वापर केल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या हल्ल्यात पथकातील सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमी पोलिसांना नायगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले.
घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. याप्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल अनिल बालाजी रिंदकवारे यांच्या फिर्यादीवरून उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास तुकाराम कवळे, श्याम परसराम अक्कलवाड, श्रीराम देविदास कवळे, पांडुरंग विठ्ठल कवळे, अक्षय अशोक कवळे, बळीराम कवळे, मोहन पवार, कैलास दादाराव कवळे, अवधूत गोविंदराव ढगे, विजय तुकाराम कवळे यांच्यासह अन्य १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शुक्रवारी दिवसभर ईळेगाव परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उमरी, धर्माबाद, नायगाव, कुंडलवाडी, बिलोली, रामतीर्थ आणि कुंटूर परिसरातील पोलिस अधिकारी व कर्मचारी गावात तळ ठोकून होते.
फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र, वृत्त लिहिपर्यंत आरोपी हाती लागले नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
उमरी तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या परिसरात अवैध वाळू उपशाविरोधात महसूल आणि पोलिस विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला करण्यापर्यंत वाळू तस्करांचे धाडस वाढल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या घटनेनंतर अवैध वाळू उपशाविरोधातील कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.