

Umri Taluka Crop Insurance
उमरी : नांदेड जिल्ह्यातील बहुतांश गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा जमा झाला असला, तरी उमरी तालुक्यातील धानोरा व सिंधी या दोन कृषी मंडळांतील सुमारे ३२ गावांतील शेतकरी अद्यापही पीकविम्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाकडून वारंवार ‘लवकरच पीकविमा मिळेल’ असे आश्वासन दिले जात असले, तरी प्रत्यक्षात विम्याची रक्कम कधी मिळणार याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.
मृग नक्षत्राच्या आगमनासह खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे. वाढती महागाई, बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांवर आधीच आर्थिक ताण आहे. अशा परिस्थितीत पीकविम्याची रक्कम मिळाल्यास काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र विमा अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे.
सिंधी, ढोलउमरी, जामगाव, हंगिरगा, बोळसा, भायेगाव, शेलगाव, इळेगाव, कुदळा, धानोरा, तुराटी, बोथी, सोमठाणा, मंडाळा, रामखडक आदी गावांसह एकूण ३२ गावांतील शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत.
पीकविम्याच्या मागणीसाठी नुकतेच धानोरा मंडळातील शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह रास्ता रोको आंदोलन केले होते. मात्र त्यानंतरही प्रश्न सुटलेला नाही. नांदेड जिल्ह्यातील ५२ मंडळांना पीकविमा मंजूर झाला असला, तरी उमरी तालुक्यातील या दोन मंडळांसह जिल्ह्यातील एकूण आठ मंडळांतील शेतकऱ्यांना अद्याप विमा मिळालेला नाही.
दरम्यान, उमरी येथे रास्ता रोको आंदोलन, धर्माबाद ते नांदेड भव्य मोटारसायकल रॅली तसेच धर्माबाद बंद यांसारख्या आंदोलनांद्वारे शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भगवान मनूरकर यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या संदर्भात कृषिमंत्री व पालकमंत्र्यांशीही संपर्क साधून पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना तातडीने विमा मिळावा, अशी मागणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात असले, तरी जोपर्यंत पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलनाचा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.