

Naigaon Taluka Crop Insurance
नायगाव : खरीप हंगामाच्या पेरण्या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना नायगाव तालुक्यातील नरसी, धुंगराळा आणि बरबडा महसूल मंडळांतील शेकडो शेतकरी अद्यापही मागील वर्षाच्या मंजूर पीकविम्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. विमा कंपनी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हक्काची मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. येत्या काही दिवसांत आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
खरीप २०२५ हंगामात अतिवृष्टीसह विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर बाधित शेतकऱ्यांनी पीकविम्याचे दावे दाखल केले. अनेकांचे दावे मंजूर झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्या बँक खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही. परिणामी मंजुरीच्या घोषणांमध्ये आणि प्रत्यक्ष मदतीमध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याचे चित्र आहे.
सध्या खरीप २०२६ हंगामासाठी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीचा खर्च उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीत मंजूर विमा रक्कम न मिळाल्याने शेतकरी गंभीर आर्थिक कोंडीत सापडले आहेत. अनेकांना खासगी सावकारांकडून किंवा कर्ज काढून शेतीची तयारी करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासन आणि विमा कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
विशेष बाब म्हणजे किती दावे मंजूर झाले, किती रक्कम वितरित करण्यात आली आणि किती प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संपूर्ण प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रश्नात लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा तालुकाभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
खरीप पेरण्यांचा हंगाम दारात येऊन ठेपला आहे. शेतकरी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी लाखो रुपयांची जुळवाजुळव करत आहेत. मात्र मागील वर्षी मंजूर झालेल्या पीकविम्याची रक्कम अद्याप खात्यात जमा न झाल्याने त्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे.
"विमा मंजूर झाल्याचे सांगितले जाते, मग पैसे खात्यात का जमा होत नाहीत?" आणि "शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर कोण बसले आहे?" असे सवाल आता उघडपणे उपस्थित केले जात आहेत.
पेरणीच्या तोंडावर निर्माण झालेली ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत गंभीर ठरत आहे. तातडीने विमा रक्कम वितरित न झाल्यास तालुकाभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. प्रशासन आणि विमा कंपनीच्या निष्क्रियतेमुळे तीनही महसूल मंडळांतील शेतकरी अक्षरशः आर्थिक संकटाच्या खाईत लोटले गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
मृग नक्षत्र सुरू होईपर्यंत पीकविम्याची रक्कम मिळाली नाही, तर माझ्यावर आत्महत्येची वेळ येऊ शकते.
- दत्ता पाटील, शेतकरी होटाळा