

Umri Balegaon barrage gates open
उमरी: उमरी तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर बळेगाव येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे शनिवारी (दि. १६) सात दरवाजे उघडण्यात आले आहेत.
आज सकाळपासूनच उमरी शहर आणि तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.
गोदावरी नदीच्या पुरामुळे नदीकाठावरील सुमारे १५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास गोदावरीला महापूर येण्याची शक्यता असून, बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडावे लागतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पुराच्या पाण्यामुळे गोदावरी नदीचे बॅकवॉटर शेतांमध्ये घुसले असून काही भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. नदी-नाल्यांना देखील पूर आल्याने परिस्थिती गंभीर होत आहे.