

उमरखेड: नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उभारलेल्या सद्भावना कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बंद डेपोतून तब्बल १ कोटी ६० लाख आणि त्यानंतर ७२ लाखांचे साहित्य दिवसा ढवळ्या चोरीला गेले होते. अखेर गेल्याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नंदू बळीराम राठोड (४९), दर्शन संतोष भंडारी (३०), प्रकाश संतोष वानखेडे (२७), शेख आबेद शेख युनूस (२५, सर्व रा. उमरखेड) आणि लखन धनसिंग जाधव (२२, रा. महागाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
महामार्गाचे काम संपल्यामुळे महागाव रस्त्यावरील सद्भावना कंपनीचा डेपो बंद होता. याचा फायदा घेत १ आणि २ ऑगस्ट रोजी डेपोत कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी इतर व्यक्तींसोबत संगनमत करून लाखोंची वाहने व निवास स्थानातील साहित्य तसेच भंगार चोरले. याप्रकरणी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सुरुवातीला १ कोटी ६० लाख रुपयांच्या चोरीचा गुन्हा नोंद झाला. मात्र त्यानंतर ७१ लाखांची आणखी चोरी झाल्याची पुरवणी तक्रार जोडण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी तपास आयपीएस अधिकारी हर्षवर्धन बी. जे. यांच्याकडे सोपविला.
तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलीस अधिकाऱ्यांनी या लूटपाट प्रकरणात गुन्हा नोंद झालेल्या चार पेक्षा अधिक आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी या पाच आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणात आणखीही काही मोठे प्रस्थ व शासकिय अधिकारी, सहभागी असण्याची शक्यता आहे. पुसद येथील सहा, पोलीस निरीक्षक रवी चव्हाण पुढील तपास करीत आहेत.