

Nanded Umarkhed petrol pump lease controversy
उमरखेड : छत्रपती शिवाजी महाराज स्मारकालगत असलेल्या आणि अनेक वर्षांपासून वादात असलेल्या पेट्रोल पंपाची लीज यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी पाच वर्षांसाठी वाढवून दिल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाविरोधात जनसुनावणी घेऊन जागेचे पुनर्निरीक्षण करावे आणि संबंधित पेट्रोल पंप हटवावा, अशी मागणी विविध पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी केली आहे.
या संदर्भात सर्वपक्षीय प्रतिनिधींनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी (एसडीओ) मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यालगत असलेल्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपाबाबत अनेक आक्षेप नोंदवले गेले असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी ते फेटाळून लावून लीज नूतनीकरणाचा आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वार्ड क्र. 1 मधील मालमत्ता क्र. 278, सुमारे 303 चौ. फुट क्षेत्रफळ असलेल्या या जागेची लीज पाच वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय नुकताच देण्यात आला. मात्र, या पेट्रोल पंपामुळे स्मारकाच्या सौंदर्यीकरणात अडथळा निर्माण होत असल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा पुनर्विचार करून संबंधित पेट्रोल पंप इतरत्र हलवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या वेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निषेध मोर्चाची घोषणा
दरम्यान, या निर्णयाच्या निषेधार्थ 27 एप्रिल रोजी सर्वपक्षीय निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शिवप्रेमी, व्यापारी, तसेच विविध संघटनांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.