

Umarkhed Minor Boy Assault Case
उमरखेड : उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी फिरायला आलेल्या एका १० वर्षीय बालकाला आपल्या वासनेचा शिकार बनवण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उमरखेड तालुक्यातील पळशी येथे घडली आहे. या प्रकरणी पोफाळी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी दिगंबर साहेबराव सदावर्ते (वय ४८, रा. पळशी) याच्याविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता चौथीमध्ये शिकणारा पीडित बालक २६ एप्रिल रोजी सुट्ट्या घालवण्यासाठी आपल्या आजोळी आला होता. ३० एप्रिलच्या सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास गावात वीज पुरवठा खंडित झाला होता. अंधाराचा आणि वीज नसल्याचा गैरफायदा घेत आरोपी दिगंबर याने बालकाला "माझ्या घरी इन्व्हर्टर आहे, तिथे हवा मिळेल, तिथे जाऊन बसू" असे आमिष दाखवून आपल्या घरी नेले.
घरी नेल्यानंतर नराधमाने दरवाजा आतून बंद करून बालकावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या बालकाने आरडाओरडा सुरू केला. सुदैवाने, बालकाचा आवाज ऐकून एका स्थानिक महिलेने तातडीने आरोपीच्या घराचा दरवाजा वाजवला. यामुळे आरोपी घाबरला आणि त्याने बालकाला सोडून दिले. बालकाने तत्काळ घर गाठून घडलेला सर्व धक्कादायक प्रकार आपल्या आजोबांना सांगितला.
आजोबांनी या घटनेची माहिती मुलाच्या वडिलांना दिली. त्यानंतर १ मे रोजी पोफाळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी दिगंबर सदावर्ते विरुद्ध पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.