

नरेंद्र येरावार, उमरी (ता. नांदेड) : उमरी तालुक्यासाठी रविवारचा दिवस काळा ठरला. एकाच दिवशी निधन, रेल्वे अपघात, आत्महत्या आणि तीन ठिकाणी भीषण दुचाकी अपघात अशा सहा घटना घडल्याने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
१) हृदयविकाराच्या झटक्याने निधन -
उमरी येथील प्रतिष्ठित नागरिक राजेश्वर लक्ष्मण मारावार उमरीकर यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने उमरी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
२) इंटरसिटीखाली सापडून तरुण गंभीर -
दुसऱ्या घटनेत नांदेडहून सिकंदराबादकडे जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसखाली सापडून उमरी तालुक्यातील बोळसा येथील दत्ताहरी पंढरी तालकोकुलवार (वय 30) हा तरुण गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याचा एक हात निकामी झाला असून एका पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्यावर उमरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले असून तो मृत्यूशी झुंज देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
३) तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले -
तिसऱ्या घटनेत उमरी तालुक्यातील बळेगाव बंधाऱ्याजवळ रविकांत शंकर वाघमोडे, (वय ३५ वर्षे, रा. सिंदखेड, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) या तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. उमरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
४) हिरडगाव शिवारात अपघात, कर्तव्यावरील होमगार्ड ठार -
चौथी आणि सर्वात दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी हिरडगाव शिवारात घडली. दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कर्तव्यावर असलेले होमगार्ड संदीप संभाजी पिंगळे (वय ३५ वर्षे, रा. सोमठाणा) हे जागीच ठार झाले. तर (येंडाळा, ता. उमरी) येथील सहशिक्षक राजेश बालाजी जाधव आणि सौ. उज्वला राजेश जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.
५) उमरी-नागठाणा रस्त्यावर दुचाकी अपघातात दोघे गंभीर -
पाचव्या घटनेत उमरी ते नागठाणा जाणाऱ्या रस्त्यावर उमरीजवळ झालेल्या दुचाकी अपघातात मारोती जगन्नाथ वडजे (वय ४५ वर्षे, रा. नागठाणा) आणि सुरज साहेबराव दुरे (वय ३२ वर्षे, रा. सायाळ, ता. भोकर) हे मामा भाचे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती नागठाणा येथील रावसाहेब वडजे यांनी दिली.
६) ट्रॅक्टरखाली सापडून तरुण गंभीर जखमी -
सहाव्या घटनेत वाघाळा तांडा येथील राहुल साईनाथ जाधव (वय २२ वर्षे) हा तरुण ट्रॅक्टरखाली सापडून गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.
एका दिवसात सहा-सहा दुर्घटना घडल्याने उमरी तालुक्यात सर्वत्र चिंता आणि शोकाचे वातावरण आहे. सर्व घटनांची नोंद उमरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.