

माळाकोळी, पुढारी वृत्तसेवा : माळाकोळी येथून जवळच असलेल्या लिंबोटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने दारू पिऊन शाळेत धिंगाणा घालण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ग्रामस्थांनी माळाकोळी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर बुधवारी (दि.१८) रात्री शिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लिंबोटी (ता. लोहा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक गोविंद ज्ञानोबा गायकवाड (वय ५०, रा. हाडोळी जहागीर, ता. लोहा) हे नांदेड येथे गेल्या तीन-चार वर्षांपासून प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. शाळेत दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते, तशी तक्रार माळाकोळी पोलीस ठाण्यात दिली. यानंतर माळाकोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची वैद्यकीय चाचणी घेतली. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत शिक्षकाच्या मागे तीन मुले, पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपतरेवारवार यांनी दिली.