

लोहा : नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसी नेते छगन भुजबळ यांना संधी न दिल्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष रमेश माळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
महायुतीचा नुकताच नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी यावेळी देण्यात आली नाही. त्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेस व छगन भुजबळ यांच्या मागे आपली शक्ती उभी करून होता. त्याचे फळ विधानसभा निवडणुकीत दिसून आले आहे. पण मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांना संधी देण्यात आलेली नाही. त्यांना मंत्रिमंडळात डावलल्यामुळे संपूर्ण राज्यासह लोहा तालुक्यात ओबीसी समाजात नाराजी पसरली आहे. त्यामुळे कार्यकर्ते आता आपापल्या पदांचा राजीनामा देत असल्याचे समोर आले आहे.
याचाच एक भाग म्हणून लोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रमेश माळी यांनी आपला पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्याकडे पाठवला आहे. तसेच ओवी समाजातील असंख्य कार्यकर्ते व मतदार राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करीत आहेत.