

किनवट : सोमवारी (दि. ९) सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील पिंपरफोडी येथील शेतकरी नागसेन पांडूरंग वाघमारे यांच्या शेतातील सोलार पॅनलचे मोठे नुकसान झाले आहे.
जी.के. सोलार कंपनीचे हे पॅनल त्यांच्या गट क्रमांक ३७/अ या शेतात बसवण्यात आले होते. मात्र जोरदार वाऱ्याच्या तडाख्यात पॅनल उध्वस्त झाले असून संपूर्ण यंत्रणा वापरायोग्य राहिलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांवर अनपेक्षित आर्थिक भार पडला आहे.
या नुकसानीनंतर शेतकरी नागसेन वाघमारे यांनी कंपनीकडे नुकसानभरपाईची मागणी केली असून, परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने पॅनल बसवताना हवामानघडीचा विचार करून मजबूत संरचना करणे अपेक्षित होते. तसे न झाल्याने थेट नुकसान शेतकऱ्याच्या माथी आले आहे.
विशेष म्हणजे सोलार कंपन्यांसोबत केलेल्या करारांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसंबंधी 'फोर्स मॅज्योर' (Force Majeure) कलम असते. ज्याअंतर्गत काही अटींसह दुरुस्ती अथवा नुकसानभरपाईची जबाबदारी कंपनीवर येते. त्यामुळे संबंधित जी.के. सोलार कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी आणि कृषक संघटनांकडून होत आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने पंचनामा करून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
‘‘अशाच प्रकारचे नुकसान तालुक्यातील इतर शेतकऱ्यांचेही झाल्यास संबंधित कंपनीसोबतचा करार तपासावा. त्या करारात ‘फोर्स मॅज्योर’ किंवा 'नुकसान भरपाई' याविषयी कोणते कलम आहे का, हे पाहावे. करारामध्ये कंपनीने विमा घेतला असल्यास, त्या आधारावर भरपाईची मागणी करता येते. कमी लेखी पुरावे असतील, तरी स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करून नुकसान सिद्ध करता येते. ‘फोर्स मॅज्योर’ हे कलम कंपनीच्या जबाबदाऱ्या टाळण्यासाठी नाही, तर दोन्ही पक्षांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी असते. अशा आपत्तींच्या वेळी संपूर्ण जबाबदारी टाळून मोकळे होता येणार नाही; कंपनीने किमान दुरुस्ती, विमा क्लेम वा तडजोड भरपाई देणे आवश्यक ठरते.’’