

Bahaddarpura Manyad river bridge
धोंडीबा बोरगावे
फुलवळ : ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीवरील पुलावरून दोन वेळा पाणी गेले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पुलाचे अंडरवॉटर परीक्षण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार कंधार बस डेपोने या पुलावरून एसटी बस तीन महिन्यापासून बंद ठेवल्या होत्या.
त्यामुळे बस गाड्यांची शेकापूर घोडज मार्गे कंधार ते मुखेड, जांब मार्गावरून वाहतूक सुरू होती. त्यामुळे प्रवाशांना त्याचा नाहक त्रास तर होत होता. पण आर्थिक भुर्दंडही बसत होता. तर दुसरीकडे याच पुलावरून अन्य अवजड वाहनांची वाहतूक सर्रासपणे चालू होती. यावरून 'दै.पुढारी'ने बातमी दिली होती. त्या बातमीची दखल घेत प्रशासनाने शनिवारीपासून (दि. १३) कंधारसह सर्वच डेपोच्या एसटी बस या पुलावरून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
इतर अवजड वाहनांची वाहतूक याच पुलावरून सुरू असताना केवळ कंधार डेपो च्या एसटी बस वाहतूक मात्र येथून बंद करण्यात आली होती. तेव्हा एसटी पेक्षा कितीतरी अवजड वाहतूक करणारे वाहने येथून जात येत आहेत. पण फक्त कंधार आगाराच्याच एसटी बसच्या गाड्यांना बंदी का..? असा प्रश्न या भागातील जनतेला पडला होता. अखेर बातमीची दखल घेत प्रशासनाला जाग आल्याने बसची वाहतूक सुरू करण्यात आली आहे .त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.