

किनवट : पुढारी वृत्तसेवा : शिवणी बामणी (बेचिराख) आणि डोंगरगाव शेत शिवारातील पहाडपट्टीचा फायदा उचलून काही शेतकऱ्यांनी गांजाची शेती केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. नांदेड, किनवट व इस्लापूर पोलिसांसह कृषी विभाग, महसूल विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने गांजा शेतीवर धाड घालून सलग दोन दिवस कारवाई केली. यात तब्बल 46 लाख 22 हजार 800 रुपये किंमतीचा 924.48 किलोग्रॅम वजनाचा तीन ट्रॅक्टर गांजा जप्त करण्यात आला. गांजा लागवड केलेल्या सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवार (दि.01) रात्री बाराच्या सुमारास किनवट तालुक्यातील शिवणी बामणी (बेचिराख) डोंगरगाव शेत शिवारात निळकंठ विश्वनाथ शेळके (40 वर्षे), विनोद शिवाजी हुरदुके (40 वर्षे), संजय गोविंद हुरदुके (35 वर्षे), राजाराम सिदोबा बावधाने (52 वर्षे ), कोंडबा गैयनाजी बावधाने (66 वर्षे ) ईश्वरदास किशन हुरदुके (50 वर्षे ) सर्व रा. डोंगरगाव या सहाजणांनी त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरून पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी भोकरचे अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांना किनवट, इस्लापूर येथून तत्काळ अधिकचे मनुष्यबळ मागवून घेऊन उपरोक्त घटनास्थळी जाऊन कारवाईची सूचना केली. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या नेतृत्वात किनवट, इस्लापूर, स्थानिक गुन्हे शाखा, आरसीपी प्लाटुनचे मिळून एकूण 140 अंमलदार व दहा पोलीस अधिकारी यांच्या पथकाने रात्री दोन च्या सुमारास शेतात छापा टाकला.
दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. 2) मौजे दिग्रस तांडा शिवारातील अमरसींग साबळे या सातव्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये छापा मारण्यात आला. तेथेसुद्धा कापूस व तुरीपिकामध्ये अंमलीपदार्थ गांजा लागवड केल्याचे आढळून आले. तेथून एकूण 427.58 किलो ग्रॅम वजनाचा 21 लक्ष 37 हजार 900 रुपये किमतीचा एक ट्रॅक्टर अंमलीपदार्थ गांजा जप्त करण्यात आला.
सात संशयितांविरुध्द किनवट पोलीस स्टेशनमध्ये अंमली पदार्थ कायदान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सात आरोपींपैकी सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सातव्या आरोपीचा शोध सुरू आहे.