

चारठाणा : पुढारी वृत्तसेवा
नांदेड-संभाजीनगर राज्य महामार्गावरील चारठाणा येथील करपरा नदीच्या चौथ्या पुलाजवळ (गुरुवार) सायंकाळी साडेसात वाजता दुचाकीवरून शंकर यादवराव लोकडे व विनोद लिंबाजी कोकाटे हे दोघेजण दुचाकीवरून केहाळ तालुका जिंतूरकडे जात होते. यावेळी जिंतूर जालनाकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यावेळी दुचाकीवरील शंकर यादवराव लोकडे हा दुचाकीस्वार पुलावरून करपरा नदीत पडला, तर विनोद लिंबाजी कोकाटे राहणार केहाळ तालुका जिंतूर हा पुलाच्या कठड्याजवळ पडून जखमी झाला.
या अपघातानंतर अज्ञात वाहनधारक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे विष्णुदास गरुड सुनील वासलवार पवन राऊत कोल्हार जिलानी शेख आदींनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. जखमी अवस्थेत पडलेल्या विनोद लिंबाजी कोकाटे यास ॲब्युलन्स मधून त्या जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात विनोद कोकाटे यांच्यावर उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने त्यास परभणी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
अपघातात पुलावरून कोसळलेल्या शंकर यादवराव लोकडे याचा पुलाखाली जाऊन शोधा घेतला, परंतु तो मिळून आला नाही. नंतर चारठाणा येथील शेख फिरोज व केहाळ येथील सात ते आठ जणांनी व पोलिसांनी नदीपात्राच्या पाण्यात जाऊन शोधा घेतला. तेंव्हा तो 100 मीटर पर्यंत वाहून गेला होता. अखेर रात्री दहा वाजता शंकर यादवराव लोकडे हा मृत्यू अवस्थेत सापडला. नंतर त्यास पाण्यातून बाहेर काढले. जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात शिवविच्छेदन करण्यात आले. भास्कर यादवराव रोकडे यांच्या फिर्यादीवरून चारठाणा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे हे करीत आहेत.