

नायगाव: गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेले अवैध वाळू उपशाचे सत्र पुन्हा वाढताना दिसत आहे. शासनाच्या बंदी आदेशाला न जुमानता काही वाळू माफिया मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून तिची खुलेआम वाहतूक करत आहेत. या बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाने गस्तीदरम्यान कारवाई करत तीन हायवा (ट्रक) वाहनांवर गुन्हा दाखल केला आहे.
महसूल पथक अंतरगाव-बरबडा मार्गावर गस्त घालत असताना शुक्रवारी (दि.१७ ऑक्टो) संध्याकाळी सातच्या सुमारास वाळूने भरलेले दोन हायवा आणि एक टिप्पर अवैधरीत्या जात असल्याचे आढळून आले. मंडळ अधिकारी कावळे व तलाठी सुनील हसनपले यांनी या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महसूल अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून एक कर्नाटक पासिंगचा हायवा पळून गेला. उर्वरित दोन वाळूने भरलेले हायवा महसूल पथकाने तात्काळ ताब्यात घेऊन कुंटूर पोलिसांच्या स्वाधीन केले.
यानंतर शनिवारी (दि.१८ ऑक्टो) तारखेला दुपारी महसूल अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून कुंटूर पोलिसांनी संबंधित वाहनांविरुद्ध गुन्हा नोंदवला. यात एमएच २६ व्हीएच ३९७५, एक विना क्रमांक असलेला हायवा, तसेच पळून गेलेला केए ३३ ए ९४६५ या तीन वाहनांचा समावेश आहे.