

नांदेड ः नांदेड ग्रामीण पोलिसांनी जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. लिमरा हिल्स कॉलनी भागात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून 1 लाख 42 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध जुगार अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. या आदेशानुसार, 5 मे 2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजेच्या सुमारास नांदेड ग्रामीण पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लिमरा हिल्स कॉलनीतील बंधारा ब्रिजजवळ काही लोक बेकायदेशीरपणे जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी सापळा रचला.
यावेळी जुगार खेळताना शेख शौकत शेख बाखर (वय 60), शेख बरकत शेख बशीर (वय 43), मोहम्मद सुबाहान मोहम्मद खाजा (वय 55), शेख अनवर शेख छोटेमियाँ (वय 52), शेख जाहेद शेख नजीर (वय 43) या पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार तेलंग करत आहेत. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.