

नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मार्ग प्रशस्त झाल्यानंतर स्था. स्व. संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे. अद्याप प्रभागरचना झालेली नसली तरी नेते मंडळी चाचपणी करीत असून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यापूर्वी जिल्ह्यातील बहुतांश स्था.स्व. संस्थांवर खा. अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून काँग्रेसचे वर्चस्व होते. परंतु आता ते स्वतः भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसपुढे बालेकिल्ले शाबूत राखण्याचे तर अशोक चव्हाण यांच्यापुढे नव्या घराला घरपण देण्याचे आव्हान असणार आहे.
पूर्वीच्या मुदखेड व आताच्या भोकर मतदारसंघातील राजकारणाचे धुराडे जरी येळेगाव परिसरातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पेटते राहिले असले तरीही; येळेगाव-देगावच्या अवती-भवतीचे राजकारण मात्र कायमच खा. अशोक चव्हाण यांच्यासाठी चढ-उताराचे राहिले आहे. या जि.प. गटातील राजकारण पाटील देशमुखांच्या आजुबाजूने फिरणारे असले तरीही या गटातील मतदारांनी एकवेळ शिवसेनेचे 'बारसे' मिरवले होते, हे विसरता येणार नाही.
गतवर्षी झालेल्या आरक्षण सोडतीत नव्याने झालेला प्रतिष्ठेने मोठा असलेला 'लहान' गट 'एसटी' साठी आरक्षित झाला आणि येळेगाव' गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील मातब्बर कारखान्याच्या आजुबाजूला घिरट्या घालत आहेत. येळेगाव गटाचे आरक्षण कायम राहिल्यास लहानचे देशमुख खा. अशोक चव्हाण यांच्या वरदहस्ताने येळेगावमध्ये घुसून पाटील गटावर राजकीय सर्जिकल स्ट्राईक करू शकतात, असे बोलले जात आहे.
दोनच महिन्यापूर्वी खा. अशोक चव्हाण यांच्या समर्थकांपैकी नागेलीकर व लहानकर भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाद झाल्यानंतर त्यांना आता जिल्हा परिषदेचे वेध लागले आहेत. भाजपातील दिग्गज समजले जाणारे लहानकर येळेगाव तर नागेलीकर बारड जिल्हा परिषद गटात चाचपणी करीत आहेत. बारडकरांच्या 'बाळू'चे मराठा आरक्षण लढ्यात 'गावबंदी' निर्णयावरून आजूबाजूच्या पाटील व मराठा
समाजात तीव्र नाराजी आहे. आता तर पक्षातील विरोधक एकत्र आल्याने भाजपाच्या तालुकाध्यक्ष पदावरही पाणी फिरले आहे; त्यामुळे तिथे हळूहळू नागेलीकर आपली मोट बांधत असून त्यांना काँग्रेसचा प्रतापगड सर करण्याचे आव्हान असणार आहे.
भाऊराव समूहाचे माजी अध्यक्ष 'गणप तराव तिडके' यांचा ऊस क्षेत्रातील अनुभव पदरी पाडून घेण्यासाठी सुपुत्र भगवान तिडके मैदानात जरी असले तरी त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवल्याची चर्चा आहे. त्यांचा लहानकर यांच्या पुढे उमेदवारी मिळवताना निभाव लागणार नाही, असे बोलले जात आहे. त्यामुळे तिडके सुपुत्राची भाजपातील वाटचाल भगवान भरोसे प्रताप जर खा. रवींद्र चव्हाण यांनी साधला तर येळेगाव जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा 'झेंडा' फडकू शकतो, असा विश्वास सदाशिव कपाटे यांना आहे.
येळेगाव जि. प. गटात लहानचे संजय देशमुख कासव गतीने शिरकाव करत असताना पाटील मंडळी आता कोणती खेळी करणार ? याकडे लक्ष लागलेले आहे. 'अभी नहीं तो कभी नहीं' या तत्वाने आमराबाद येथील एका आसामी पाटलांचे बंधुही आखाड्यात उतरू शकतात, असेही बोलले जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अगोदरच येळेगाव गटात देशमुख व पाटील या दोन गटांत धुमश्चक्री होण्याची शक्यता ऐकावयास मिळत आहे.