

Nanded Political News Muncipal Election
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड-वाघाळा मनपाच्या निवडणुकीत वेगवेगळ्या प्रभागांमध्ये भाजपा उमेदवारांविरुद्ध बंडाचा झेंडा फडकविण्याच्या तयारीत असलेल्या पक्षाच्याच बहुतांश कार्यकर्त्यांचा राग शांत करण्यात अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे या खासदारद्वयांना शुक्रवारी यश आले. पक्षाविरुद्ध बंडखोरीच्या तयारीत असलेल्यांना माघार घ्यायला लावतानाच भाजपाने ऐनवेळी शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या आपल्याच दोन कार्यकर्त्यांनाही निवडणूक रिंगणातून बाहेर काढले.
मनपा निवडणुकीसाठी भाजपाने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपले ६७उमेदवार निश्चित केल्यानंतर ज्यांना संधी मिळाली नाही, अशा दीडशेहून अधिक इच्छुकांनी आपापल्या प्रभागांमध्ये अर्ज दाखल केले असल्याची बाब छाननी प्रक्रियेनंतर समोर आली. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अर्ज दाखल केलेल्या भाजपाच्याच कार्यकत्यांशी संपर्क साधण्याची मोहीम गुरुवारपासून सुरू झाली. खा. अशोक चव्हाण व खा. गोपछडे यांच्यासह आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध अर्ज दाखल केलेल्यांना टप्प्याटप्प्याने एका ठिकाणी बोलावून घेतले. दोन दिवसांच्या दोन-तीन सत्रांतून वरील नेत्त्यांनी आपल्या अंगभूत कौशल्याद्वारे बहुतांश बंडोबांना थंडोबा केले. एक-दोन प्रकरणांत मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागल्याचे समजते.
पक्षाचे माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या स्नुषा सुप्रिया संजय पाटील यांना पक्षाने शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारली होती. त्यांनी प्रभाग क्र.९ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गात तर रातोळीकर यांचे पुत्र संजय पाटील यांनी त्याच प्रभागात ओबीसी प्रवर्गात अर्ज दाखल केला होता. संजय पाटील अपक्ष उभे राहण्याच्या विचारात असल्याचे समोर आल्यानंतर पक्षाचे दोन्ही खासदार रातोळीकर यांच्याशी बोलले. नंतर रातोळीकर यांना थेट मुख्यमंत्र्यांचा फोन आला. एकंदर परिस्थिती कथन करून रातोळीकर यांनी मुलगा व सुनेचा अर्ज मागे घेण्याचे मान्य केले. उपक्रमशील कार्यकर्ते दिलीप ठाकूर यांनी अन्यायाविरुद्धची आपली खदखद गुरुवारी एका पत्रातून व्यक्त केली होती; पण चव्हाण आणि गोपछडे यांनी ठाकूर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना वजिराबाद प्रभागातून माघार घेण्यास लावली.
काही प्रभागांमध्ये मित्रपक्षांचे आव्हान आणि दुसरीकडे भाजपाच्याच कार्यकत्यांनी स्वबळावर उभे राहण्याची तयारी केल्यामुळे या पक्षाचे दिग्गज उमेदवार गुरुवारी अस्वस्थ झाले होते; पण नेत्यांच्या प्रयत्नांमुळे शुक्रवारी दुपारनंतर त्यांच्यावरील ताण कमी झाला. दोन दिवसांतल्या घडामोडींमध्ये भाजपाने आपल्या पक्षाबाहेरील काही अपक्षांनाही माघार घ्यायला लावली. तसेच उमेदवार निवडीत अन्याय झाल्यामुळे शेवटच्या क्षणी शिवसेनेकडून उमेदवारी घेणाऱ्या दोन जणांनी शेवटच्या दिवशी माघार घेत भाजपाला पाठिंचा दिला. प्रभाग क्र.५ मधील महेंद्र पिंपळे यांनी खा. चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपाचे उपरणे घालून घेतले.
ठाकूर यांची माघार; पक्षसंघटनेत नियुक्ती
खा. अजित गोपछडे यांनी गुरुवारी रात्री दिलीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधून त्यांना खा. चव्हाण यांच्याकडे पाचारण केले. ठाकूर यांनी आधी येण्यास नकार दिला; पण जुन्या ऋणानुबंधांना स्पर्श करत गोपछडे यांनी त्यांचा राग शांत करून त्यांना नेत्यांकडे आणले. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. नेमकी काय अडचण आली, ते स्वतः खा. चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यानंतर गोपछडे यांनी ठाकूर यांच्यासारखा कार्यकर्ता पक्षसंघटनेत महत्त्वाच्या जबाबदारीवर असला पाहिजे, असा पर्याय ठेवला. त्यावर चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संमतीनुसार ठाकूर यांना महानगर भाजपाच्या सरचिटणीसपदी नियुक्त करण्याचे ठरले. या नियुक्तीचे पत्र त्यांना शुक्रवारी सकाळीच देण्यात आले. त्यांच्यावर पक्ष कार्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.