

Major action taken against sand smugglers in Nanded district
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि विनापरवाना रेती वाहतुकीविरोधात पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नांदेड ग्रामीण, विमानतळ व धर्माबाद पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण ७१ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कल्हाळ गोदावरी नदी घाटावर करण्यात आली. येथे नदीपात्रातून विनापरवाना जेसीबीच्या साहाय्याने रेतीचा उपसा केला जात होता. पोलिसांनी धाड टाकून एक जेसीबी आणि एक टिपर असा एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी साईनाथ व्यंकटी काळे (रा. किवळा, ता. लोहा) व मोहन सिताराम राठोड (रा. बाबुळगाव, ता. जि. नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिल्वर ओक हॉटेलसमोरील रस्त्यावर करण्यात आली. पोलिसांनी एका हायवा टिपरची तपासणी केली असता त्यात ५ ब्रास अवैध रेती आढळली. पोलिसांनी २५ लाख रुपयांचा टिपर आणि २५ हजार रुपयांच्या रेतीसह एकूण २५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी माधव मारोती तारु (रा. पुयडवाडी, नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे.
तिसरी कारवाई धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकाळा फाटा येथे झाली. धर्माबाद ते कारेगाव जाणाऱ्या मार्गावर विना नंबरच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून १ ब्रास रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ५ लाख ७० हजार रुपयांचा ट्रॅक्टर व ६ हजार रुपयांची रेती असा एकूण ५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गंगाराम सायलू पलगे (रा. शांतीनगर, धर्माबाद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धडक मोहिमेत एकूण १ जेसीबी, ३ वाहने आणि ६ ब्रास रेती असा ७१ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात अवैध रेती चोरी व गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर अशीच कठोर कायदेशीर कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.