Nanded Painganga River Water Crisis | पैनगंगा नदी कोरडीठाक; नदीकाठच्या गावात भीषण पाणीटंचाई!

nanded painganga river water crisis |पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पळसपूरच्या ग्रामस्थांचे नदीपात्रात अर्धनग्न आंदोलन; ‘पाणी सोडा, अन्यथा उठणार नाही’ असा आक्रमक पवित्रा
nanded
पाणी सोडा, अन्यथा उठणार नाही’ असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला
Published on: 
Updated on: 

हिमायतनगर - विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी गेल्या दोन महिन्यांपासून कोरडीठाक पडली आहे. नदीपात्रात पाणी सोडले जात नसल्याने नदीकाठच्या गावांमधील पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या असून बोअरवेल आणि विहिरींनीही तळ गाठला आहे. परिणामी, नागरिकांसह जनावरे आणि वन्यप्राण्यांवरही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. वारंवार जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाकडे निवेदने देऊनही मागणीची दखल घेतली जात नसल्याने सोमवारी हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील ग्रामस्थांनी थेट पैनगंगा नदीपात्रात उतरून अर्धनग्न आंदोलन सुरू केले. ‘नदीपात्रात पाणी सोडा, अन्यथा आंदोलनातून उठणार नाही,’ असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

nanded
Nanded police seize illegal sand assets |वाळू तस्करांवर कारवाई; ८०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

पैनगंगा नदीवर अवलंबून असलेल्या नदीकाठच्या अनेक गावांतील पाणीपुरवठा योजनांना नदीपात्रातील पाण्याचा आधार आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून नदीपात्र कोरडे पडल्याने पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बोअरवेल आणि विहिरींची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जनावरांसह वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

nanded
Parbhani Accident | पूर्णा-नांदेड महामार्गावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

विशेष म्हणजे, पावसाळ्यात धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडले जाते. त्यावेळी नदीला पूर येऊन नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जातात आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र, त्याच नदीकाठच्या शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याची शोकांतिका आहे. त्यामुळे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था नदीकाठच्या गावांची झाली आहे.

पळसपूर येथील ग्रामस्थांनी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी करत जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र, प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी सकाळपासून नदीपात्रात उतरून अर्धनग्न आंदोलन सुरू केले.

आंदोलनस्थळी महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन वरिष्ठांना परिस्थिती कळविण्याचे आश्वासन दिले. मात्र, केवळ आश्वासनावर समाधान न मानता नदीपात्रात प्रत्यक्ष पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे.

पैनगंगा नदीपात्रात तातडीने पाणी सोडून नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी पळसपूरच्या ग्रामस्थांकडून होत असून प्रशासन आता या आंदोलनाची कितपत दखल घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.