

नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड होवून 5 दिवस उलटले तरी या निवडीला आव्हान देणारी काँग्रेसची याचिका अद्याप महानगरपालिकेच्या कागदी घोड्यात अडकली आहे. न्यायालयीन प्रक्रियेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रेच काँग्रेसच्या हाती लागले नसल्यामुळे याचिका दाखल होऊ शकली नसल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी महानगरपालिकेत घडलेल्या नाट्यमय घडामोडीत महापौर कविता मुळे यांनी एमआयएमचे मसूद अहमद खान यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचे पत्र दिल्यामुळे काँग्रेस-वंचित आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या आघाडीचे 15 नगरसेवक असतानाही महापौरांनी 14 नगरसेवक असलेल्या एमआयएमच्या पारड्यात विरोधी पक्षनेतेपद टाकल्याचा आरोप काँग्रेस-वंचित आघाडीने केला आहे.
महापौरांच्या निर्णयाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गटनेते प्रशांत इंगोले आणि काँग्रेसचे अब्दुल गफार यांनी दिली होती. दोन दिवसांत याचिका दाखल होणार असून त्यासाठी औरंगाबाद खंडपीठात वकिलांसोबत कायदेशीर सल्ला घेतला जात असल्याचेही सांगण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी लागणारी साक्षांकित कागदपत्रे मिळाले नसल्यामुळे शुक्रवारपर्यंत याचिका दाखल होऊ शकली नव्हती.
विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीला आव्हान देण्यासाठी काँग्रेस-वंचित आघाडीला लागणाऱ्या कागदपत्रांसाठी महापालिकेत खेटे मारावे लागत असून प्रशासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक सहकार्य करीत नसल्याचा आरोपहही होत आहे. याचिकेला विलंब व्हावा यासाठी आघाडीला झुलवत ठेवले जात आहे, की आघाडीची पुन्हा कायदेशीर बाबीतही कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी चर्चा सुरु आहे.
काँग्रेसची मानसिकता नाही का?
विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस-वंचित आघाडीने सुरुवातीपासूनच मवाळ भूमिका घेतल्याचे दिसते. आक्रमक पवित्रा घेतला नसल्यामुळेच महापौरांनी सहजासहजी आणि तडकाफडकी निर्णय घेऊन आघाडीला ठेंगा दाखवला. त्यानंतरही आव्हान याचिका दाखल करण्यासाठी आघाडीकडूनच चालढकल होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. न्यायालयीन लढाईसाठी आघाडीच्या नेत्यांची पाहिजे तशी मानसिकता दिसत नाही, असेही बोलले जात आहे.