

Nanded Ninth Guru of Sikhs Shri Guru Teg Bahadur Sahib Ji samagam program
नांदेड : पुढारी वृत्तसेवा : शिखांचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम सोहळ्यासाठी रविवारी (दि. २५) नांदेड नगरी सज्ज झाली आहे. या ऐतिहासिक आणि भव्य सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर आज नांदेडमध्ये दाखल होत आहेत.
देश-विदेशातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. २४ आणि २५ जानेवारी असे दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची रविवारी सांगता होत असून, या मुख्य सोहळ्यासाठी सचखंड नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमास राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे देखील उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्र्यांसह राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर अतिमहत्त्वाचे व्यक्ती एकाच वेळी नांदेडमध्ये येत असल्याने शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोदी मैदान आणि गुरुद्वारा परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
असा आहे अमित शहांचा दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे रविवारी दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंघजी विमानतळावर विशेष विमानाने आगमन होईल. विमानतळावरून ते थेट सचखंड गुरुद्वारा येथे जातील आणि गुरुचरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी ४:३० वाजता मोदी मैदान येथे आयोजित ३५० व्या शहीदी समागम मुख्य कार्यक्रमास ते उपस्थित राहून जनसमुदायाला संबोधित करणार आहे.