

Nanded News: School Nutrition Programme – Honorarium for Staff Delayed
संघपाल वाघमारे
कंधार : तालुक्यातील खासगी व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी शासनाकडून शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून या योजनेत विविध पदार्थांचा समावेश केला जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांसाठी हा आहार शिजविणाऱ्या स्वयंपाक्याच्या समस्यांकडेच दुर्लक्ष होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
तालुक्यातील पोषण आहार शिजविणारे स्वयंपाकी जून महिन्यापासून तब्बल पाच महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. अत्यल्प मानधनावर विद्यार्थ्यांसाठी दररोज स्वयंपाक करण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या स्वयपाकी मानधनासाठी महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागत आहे. जेमतेम अडीच हजार रुपये मासिक मानधन, त्यात पाच महिन्यांपासून थकीत रक्कम, अशी परिस्थिती असल्याने संबंधित स्वयंपाक्या पुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी पार पाडूनही त्यांच्या मानधनाच्या बाबतीत मात्र विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात घरखर्च भागविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. अशा परिस्थितीत अत्यल्प असलेले मानधनही वेळेवर मिळत नसल्याने स्वयंपाकी यांची आर्थिक कोंडी होत आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी आम्ही नियमितपणे एकाम करतो; मग आमच्या मेहनतीचे पैसे वेळेवर का मिळत नाहीत? कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा?' असा सवाल उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या ताटात पोषण देणाऱ्या हातांवरच उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने या प्रश्नाकडे पाहून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यामध्ये स्वयंपाकी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भोजनामागे या महिलांचे श्रम आहेत. मात्र, याच महिलांचे मानधन महिनोमहिने रखडत असेल तर योजनेच्या अंमलबजावणीतील ही विसंगती दूर करण्याची गरज आहे. मानधनासाठी वारंवार प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी शासन व संबंधित विभागाने नियमित व वेळेवर मानधन उपलब्ध करून देण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.