

Nanded News: Painganga River water level drops; use water judiciously
श्रीक्षेत्र माहूर : पुढारी वृत्तसेवा माहूर शहराला पाणीपुरवठा नदीतील करणारी पैनगंगा नदी पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उन्हाची तीव्रता कायम असल्यामुळे पाण्याच्या पातळीत लक्षणीयरीत्या घट झाली असून नगर प्रशासनासमोर पाणी पुरवठ्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी कंकावार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, आणि दिघडी येथील उच्च पातळी बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची त्यांना विनंती केली. त्यानुसार लवकरच पाणी सोडले जाईल असे आश्वासन त्यांना मिळाले आहे.
नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी शुक्रवारी विहिरीची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. त्यांचे समवेत कार्यालयीन अधीक्षक संदीप गजलवाड, विजय शिंदे व शंकर दामलवार उपस्थित होते. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. माहूर शहरवासीयांनी पाण्याचा अपव्यय टाळून नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी केले.