

उमरखेड: उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या ईसापुर धरणाच्या आवक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणात सध्या ९२ टक्क्यांवर पाणीसाठा जमा झाला असून,४४०.१० मीटरच्यावर पाणी पातळी पोहोचली आहे. पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने सोमवारी (दि,११) दुपारी बारा वाजता धरणाचे दोन दरवाजे वीस सेमी ने उघडण्यात आले अशी माहीती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
ईसापुर धरणाच्या आतापर्यंतच्या इतिहासात ऑगस्ट महिन्यात केवळ तीनदा धरणाचे गेट उघडण्यात आली होती. यात २००६, २०१३ आणि २०२२ साली पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणाची गेट उघडण्यात आली होती. यात सर्वाधिक पाण्याचा विसर्ग हा ऑगस्ट २००६ साली धरणातून करण्यात आला होता. यावेळी ईसापुर धरणाची इतिहासात पहिल्यांदाच १५ पैकी १५ गेट उघडण्यात आली होती. यात काही गेट अडीच मीटर ने तर काही गेट चार मीटरने उघडण्यात आली होती. यातून ५ हजार ४३९ क्यूमेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. या काळात मोठ्या प्रमाणात पैनगंगा नदीला महापूर आल्याने अनेक गावांना या पुराचा वेढा पडला. मोठ्या प्रमाणात शेत पिकांच नुकसान झालं होतं. गावात सुद्धा पाणी घुसल्याने मोठी वित्तहानी झाली होती. बोटीच्या सहाय्याने गावातील नागरिकांना बाहेर काढण्यात आलं होतं.
धरणाचे १ आणि १५ नंबरचे गेट इतिहासात एकदाच उघडले..
ईसापुर धरणाच्या पंधरा गेट पैकी १ नंबरचे गेट आणि १५ नंबरचे गेट ईसापुर धरण बांधल्यापासून आत्तापर्यंत धरणाच्या इतिहासात केवळ एकदाच ऑगस्ट २००६ या साली धरणाचे सर्वच म्हणजेच १५ गेट उघडण्यात आले होते. त्यानंतर हे दोन गेट कधीच उघडण्यात आलेली नाहीत.
धरणाच्या पाणी पातळीच्या आर ओ एस नियमानुसार
धरणाच्या पाणी पातळीच्या नियमानुसार 15 ऑगस्ट पर्यंत पाणी पातळी ४४०.३५ ते ४४०.६८ मीटरच्यावर गेली नाही तर १६ ऑगस्ट नंतर मात्र परिस्थिती बदलते. धरणाच्या पाणी पातळीच्या आर ओ एस" नियमानुसार १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ४४०.६१ ते ४४०.८२ मीटर वर पाणी पातळी पोहोचताच धरणाची गेट उघडली जातील. आणि पाण्याचा विसर्ग करण्यात येईल.