

Nanded News: Chief Minister avoids speaking against MLA Chikhlikar
लोहा, पुढारी वृत्तसेवा : लोहा नगर पालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोहयात गुरुवारी (ता. २७) जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रतापराव यांचा जिव्हाळा सर्वश्रुत आहे. पक्ष बदलल्यानंतर पहिल्यांदाच प्रतापरावांच्या होमग्राउंडवर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात एकही शब्द प्रतापरावांच्या विरोधात बोलले नाही. याचा संपूर्ण शहरात संदेश गेला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर व्यासपीठावरील स्थानिक भाजपा नेते व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचे चेहरे पडल्याचे दिसून आले.
लोहा नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आहे. शहराच्या इतिहासात पाहिल्यांदाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सभा गुरुवारी झाली. मुख्यमंत्र्याच्या जवळचे आ. चिखलीकर आहेत, अशी जिल्ह्याला ओळख असून जिल्ह्यात भाजपा मजबूत करण्यात प्रतापराव यांचे मोठे योगदान आहे. परंतु, त्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करून, भाजपला रामराम केला होता.
त्यामुळे गुरुवारच्या सभेमध्ये मुख्यमंत्री प्रतापरावांच्या विरोधात बोलणार अशी सर्वांची खात्री होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी आपल्या पंधरा मिनिटांच्या भाषणात आ. चिखलीकर यांच्या विरोधात एकही शब्द उच्चारला नसल्याने भाजप नेते व कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला.
सभेला खा. अशोक चव्हाण, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. अजित गोपछडे, आ. तुषार राठोड, आ राजेश पवार, माजी आ. अमरनाथ राजूरकर, मराठवाडा संघटक संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे आदी उपस्थित होते.
पक्ष प्रवेश घेणाऱ्यांचाही नामोउल्लख नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येण्यापूर्वी भाजपाच्या जाहीर प्रचार सभेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजी धुळगंडे यांच्यासह काहींनी भाजपामध्ये प्रवेश केला. पण मुख्यमंत्री यांनी त्याचा साधा नामोउल्लेखही आपल्या भाषणातून केला नाही.