

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेडसह मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके डोळ्यांदेखत कोमेजत आहेत. उत्पादन हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत असताना नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर यांनी कोमेजलेल्या सोयाबीनच्या रानात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. मात्र त्याचवेळी त्यांच्या नावाने आयोजित 'आनंद उत्सव' दहीहंडी कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम होणार असल्याने दुष्काळी परिस्थितीत लाखोंची उधळण होणार आहे.
शहरात भाजपाच्या वतीने दहीहंडी कार्यक्रम पार पडल्यानंतर आता शिंदे शिवसेनेच्या वतीने ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हिंगोली गेट येथे 'आनंद उत्सव' दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गौतमी पाटील उपस्थित राहणार आहेत. गौतमी पाटील यांनी स्वतः समाजमाध्यमांवर प्रसारित केलेल्या चलचित्रातून सांगितले आहे.
या चलचित्रात त्यांनी 'आमदार आनंद बोंढारकर' आणि 'आनंद उत्सव दहीहंडी' असा स्पष्ट उल्लेख केला आहे. एकीकडे पाण्याअभावी खरीप पिके करपत आहेत, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पिकांच्या नुकसानीची चिंता आहे; तर दुसरीकडे त्याच काळात दहीहंडीच्या जल्लोषासाठी लाखोंची उधळण होत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात रानात जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेणारे राजकीय नेतृत्व आणि त्याचवेळी होणारा मोठा मनोरंजनाचा जल्लोष यातील विरोधाभास त्यामुळे ठळकपणे समोर आला आहे.
शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी
होण्यासाठी शेताच्या बांधावर जाणे ही संवेदनशीलतेची बाब आहे. मात्र, त्या संवेदनशीलतेचे प्रतिबिंब सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनातही दिसणे अपेक्षित आहे. दुष्काळाच्या सावटाखाली शेतकरी संकटात असताना उत्सवाचा जल्लोष आणि त्यासाठी होणारी लाखोंची उधळण यामुळे 'आनंद उत्सव' आता चर्चेचा विषय ठरला.
संकट शेतात, जल्लोष शहरात !
गतवर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातचे पीक हिरावले, तर यंदा पावसाने पाठ फिरवल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. शेतात उभी पिके करपत असताना शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे नेतृत्व आणि दुसरीकडे शहरातील दहीहंडीच्या जल्लोषात लाखोंची उधळण, हा विरोधाभास अस्वस्थ करणारा आहे. उत्सव साजरा करण्यापेक्षा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अश्रृंना आधार देण्याची वेळ आज अधिक महत्त्वाची मानली जात आहे.