

6 killed, eight injured in accident near Bhokar
नांदेड/भोकर, पुढारी वृत्तसेवा : नांदेड-भोकर महामार्गावरील सीताखांडी घाटात गुरुवार (दि. १०) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भरधाव मॅजिक वाहन आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सहा प्रवाशी जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये भोकर येथील दाम्पत्याचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ऐन पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडहून भोकरकडे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारे खासगी मॅजिक वाहन (एमएच २६ एके ०५४८) अत्यंत भरधाव वेगात होते. सीताखांडी घाटातील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, या वाहनाने भोकरहून नांदेडकडे येणाऱ्या मालवाहू ट्रकला (एपी २९ टीए ६१२९) जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भयंकर होता की, मॅजिकचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि सहा प्रवाशांनी घटनास्थळीच प्राण सोडले. मॅजिक गाडीतील सय्यद अलमास (30, रा. बिलारनगर, भोकर), शेख फिरोज (35, रा. भोकर), पांडुरंग लिंगू वाघमारे मिस्त्री (55) व त्याची पत्नी लक्ष्मीबाई पांडुरंग वाघमारे (रा. सय्यद नगर, भोकर) बलवान पवार (रा. पोटातांडा, ता. हदगाव) आणि एक अनोळखी असे सहा जण ठार झाले-
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत ट्रकचालक बासुमिया शेख काजुमिया (रा. तेलंगणा), शेख खलील (रा. भोकर), सोमनाथ येळगे (रा. जांभळज) यांच्यासह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नांदेडला हलवण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोळ्याच्या सणादिवशीच झालेल्या या अपघताच्या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. प्रवाशांचे जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या अवैध आणि अतिवेगाने होणाऱ्या प्रवासी वाहतुकीमुळेच हा अपघात घडल्याचे समोर आले असून, भोकर पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या अपघाताबद्दल माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे आणि भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी दुःख व्यक्त केले आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला दिले आहेत. अपघातातील जखर्मीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून उपचारात कोणतीही हयगय होऊ नये, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
वाघमारे दाम्पत्यावर काळाचा घाला
या भीषण अपघातात भोकर येथील सय्यद नगर भागातील रहिवासी असलेले पांडुरंग लिंगू वाघमारे (४५) आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पांडुरंग वाघमारे या दाम्पत्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. पोळ्याच्या सणानिमित्त दोघेही काही कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी घरी परतत असतानाच सीताखांडी घाटात त्यांच्यावर काळाने झडप घातली. एकाच अपघातात पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याने वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.